T20 World Cup 2024 News: टी-२० विश्वचषक २०२४ मधील सर्वच सामने अगदी अटीतटीचे होत आहेत. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. नेपाळचा संघ टी-२० विश्वचषकासाठी ड गटात आहे. नेपाळ संघाला पहिल्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध ६ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आता नेपाळ संघासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. एक स्टार खेळाडू संघात सामील होणार आहे. सध्याच्या टी-२० विश्वचषकात नेपाळचे अजून तीन सामने बाकी आहेत. नेपाळचा संघ १० वर्षांनंतर टी-२० विश्वचषकात सहभागी झाला आहे.

बलात्कार प्रकरणात अडकलेला नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लमिचने वेस्ट इंडिजमध्ये नेपाळ संघात सामील होणार आहे. तो अमेरिकेत नेपाळ संघासोबत पहिला सामना खेळू शकला नाही. कारण त्याला व्हिसा मिळाला नाही. नेपाळ संघाला ११ जून रोजी फ्लोरिडामध्ये श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकातील दुसरा सामना खेळायचा आहे. लमिचने या सामन्यातही खेळू शकणार नाही कारण तो थेट वेस्ट इंडिजमध्ये संघात सामील होणार आहे.

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी संदीप पोलीस कोठडीत होता. मात्र तेथील न्यायालयाने नुकतीच त्याची सर्व आरोपातून मुक्तता केली होती. यानंतर त्याने टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्जही केला होता, पण नेपाळमधील अमेरिकन दूतावासाने तो नाकारला होता.

नेपाळ क्रिकेट असोसिएशनचे सचिव पारस खडका यांनी निवेदनात सांगितले की, नेपाळचा खेळाडू संदीप लमिचाने सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजला रवाना होणार असून नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघात सामील होणार आहे. याशिवाय संदीप लामिछानेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहिले की, मी आता वेस्ट इंडिजमधील शेवटच्या दोन सामन्यांसाठी राष्ट्रीय संघात सामील होत आहे. तमाम क्रिकेट चाहत्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहे. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, मी तुमच्या आशीर्वादांचा सदैव ऋणी राहीन.

संदीप लामिछानेने २०१८ साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने नेपाळ संघासाठी ५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११२ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ५२ टी-२० सामन्यांमध्ये ९८ विकेट्स घेतल्या आहेत. तो त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने नेपाळ संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याचप्रमाणे संदीप आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतानाही दिसला.