T20 World Cup 2026 Qualified Teams: टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होण्याची संभाव्य तारीख समोर आली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणारा टी-२० विश्वचषक ७ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील २० संघ पात्र ठरले आहेत. तर एक संघ पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे, जाणून घेऊया कोणते आहेत हे संघ…

टी-२० विश्वचषक २०२५ स्पर्धा आयपीएल २०२६ च्या आधी भारत आणि श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. भारतात पाच ठिकाणी हे सामने खेळवले जातील. तर श्रीलंकेत कोणत्या तरी एकाच ठिकाणी सामने होणार असून अद्याप ठिकाण निश्चित झालेलं नाही. आयसीसी लवकरच स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करणार आहे.

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होतील. भारत आणि श्रीलंका हे संघ यजमान म्हणून स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील अव्वल सात संघांनाही थेट पात्रता मिळाली आहे, ज्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. याशिवाय, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि आयर्लंड यांनी त्यांच्या टी-२० क्रमवारीच्या आधारे पात्रता मिळाली.

कॅनडा अमेरिका पात्रता फेरीतून पात्र ठरला, तर इटली नेदरलँड्स, नामिबिया आणि झिम्बाब्वे यांनी आपापल्या प्रदेशातून वर्ल्डकप खेळण्याची पात्रता मिळवली. आशिया ईएपी पात्रता फेरीतील अखेरच्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती (यूएई) टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरणारा २० वा आणि शेवटचा संघ ठरला. ओमानमध्ये झालेल्या आशिया-पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता स्पर्धेत अव्वल तीनमध्ये स्थान मिळवून युएईने विश्वचषकासाठी पात्रता मिळवली. यापूर्वी नेपाळ व ओमान हे संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले.

इटलीचा संघ टी-२० विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदाच खेळणार आहे. स्पर्धेचे स्वरूप २०२४ च्या टी-२० विश्वचषकाप्रमाणेच असेल. २० संघांना चार गटांमध्ये विभागले जाईल, प्रत्येक गटात पाच संघ असतील. प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर चार संघांशी एकदा खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ फेरीत प्रवेश करतील. जिथून चार सर्वोत्तम संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील आणि त्यानंतर दोन अव्वल संघ जेतेपदासाठी लढतील.

टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेल्या २० संघांची यादी

टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या २० संघांमध्ये भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, नेपाळ, ओमान, युएई, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड यांचा समावेश आहे.