दुबई : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात एकही बदल न होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे हार्दिक पंडय़ाच्या तंदुरुस्तीविषयी संभ्रम कायम असला, तरी मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूरला मात्र संघातील स्थानासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे, असेच सध्या दिसून येते.

पाकिस्तानविरुद्ध २४ ऑक्टोबरला झालेल्या लढतीत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. या लढतीत हार्दिकने अवघ्या ११ धावा केल्या. तसेच त्याचा उजवा खांदाही दुखावला. ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामातील उत्तरार्धात हार्दिकने एकदाही गोलंदाजी केली नाही. त्यामुळे हार्दिकऐवजी लयीत असलेल्या इशान किशनला संधी द्यावी अथवा अतिरिक्त गोलंदाज खेळवायचा असल्यास शार्दूलला स्थान द्यावे, असे अनेक जाणकारांनी सुचवले. परंतु प्रेरक महेंद्रसिंह धोनीच्या रणनीतीला आदर्श मानून विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध खेळवलेल्या ११ जणांवरच पुन्हा विश्वास दर्शवण्याची दाट शक्यता आहे.

पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा, के. एल. राहुल यांची सलामी जोडी स्वस्तात माघारी परतली. तर सूर्यकुमार यादवलाही छाप पाडता आली नाही. कोहलीने झुंजार अर्धशतक झळकावून भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. परंतु गोलंदाजीत एकालाही यश लाभले नाही. विशेषत: भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीत भेदकताही जाणवली नाही. तसेच फलंदाजांनी त्यांच्यावर सहज हल्लाबोल केला. शमीला या कामगिरीमुळे समाजमाध्यमांवर काहींकडून लक्ष्यही करण्यात आले. त्यामुळे शार्दूलला न्यूझीलंडविरुद्ध हमखास स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती.

शार्दूलने ‘आयपीएल’मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या विजेतेपदात मोलाचे योगदान दिले. तर किशनने सराव सामन्यांत चमकदार कामगिरी केली. फिरकीपटू वरुण चक्रवतीसुद्धा बळी मिळवण्यात अपयशी ठरल्याने त्याच्याऐवजी अनुभवी रविचंद्रन अश्विनला स्थान मिळण्याची शक्यता होती. परंतु सध्या तरी कोणत्याही खेळाडूला गंभीर दुखापत झाल्याशिवाय भारतीय संघात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

बुमरावर अवलंबून राहू नये – मुरलीधरन

दुबई : भारतीय संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषकात सातत्याने सामने जिंकायचे असल्यास त्यांनी गोलंदाजीत केवळ जसप्रीत बुमरावर अवलंबून न राहता संघात योग्य समतोल साधणे गरजेचे आहे, असे सूचक विधान श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने केले. ‘‘भारताच्या गोलंदाजीबाबत मला चिंता आहे. जसप्रीत बुमरा त्यांना सामने जिंकवून देऊ शकतो. मात्र, सातत्याने सामने जिंकण्यासाठी त्यांनी केवळ त्याच्यावर अवलंबून राहता कामा नये,’’ असे मुरलीधरनने म्हटले आहे.

गडी बाद करणाऱ्या फिरकीपटूंची गरज

नवी दिल्ली : भारतीय संघाला गडी बाद करू शकतील अशा फिरकीपटूंची गरज आहे, असे मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने व्यक्त केले. ‘‘भारताला गडी बाद करू शकतील असे फिरकीपटू गरजेचे आहेत. जो फिरकीपटू धावा रोखण्यापेक्षा बळी घेण्यावर भर देतो, त्याला मी नेहमीच प्राधान्य देतो,’’ असे मांजरेकर म्हणाले. वरुण चक्रवर्ती-रवींद्र जडेजा यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आठ षटकांत ६१ धावा दिल्या.