Mohammad Shami 4 Wickets Video: जसप्रीत बुमराह नाही, रवींद्र जडेजा नाही आता विश्वचषकात भारताच्या संघाचं काय भविष्य? असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना मोहम्मद शमीने भारतीय क्रिकेटप्रेमींना सुखावणारा खेळ दाखवला आहे. टी २० विश्वचषक सामन्याच्या पहिल्या सराव सत्रात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या हातातील विजय खेचून आणू शमीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात अवघ्या काहीच धावांची गरज असताना मोहम्मद शमीने अत्यंत महत्त्वाच्या ४ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आल्या पावली माघारी जाण्यास भाग पाडले. १८० धावांमध्ये पूर्ण ऑस्ट्रेलिया संघ तंबूत परतल्याने भारत ६ धावा राखून विजयी ठरला आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद शमीला २० व्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी दिली. ऑस्ट्रेलियाच्या संघाला चार धावा देऊन शमीने षटकाची सुरुवात केली पण त्यानंतर एका पाठोपाठ एक करत चार खेळाडूंना शमीने तंबूत धाडले. सुरुवातीला शमीच्या चेंडूवर पॅट क्युमिन्सने षटकार लागवण्याचा प्रयत्न केला पण विराट कोहली थक्क करणारी कॅच पकडून शमीला साथ दिली. यानंतर अॅश्टन अॅगरला सुद्धा शमीनेच धावबाद केले. यानंतर जॉश इंग्लिस, केन रिचर्डसन यांना शमीने क्लीन बोल्ड करून आपली हॅट्रिक पूर्ण केली.

मोहम्मद शमीची जादू पाहून ऑस्ट्रेलिया थक्क

टी २० विश्वचषकाच्या काहीच दिवस आधी जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर पडला. अशावेळी भारताची गोलंदाजांची फळी दुबळी पडणार असे वाटत होते. मात्र करोनावर मात करून अवघे दोन दिवस शिल्लक असताना शमी संघात परतला आणि आज सराव सत्रात त्याने आपली जादू दाखवून दिली. विश्वचषक सामन्यात शमीच्या पुनरागमनाचा भारतीय संघाला कितपत फायदा होतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.