टी-२० वर्ल्डकपमध्ये एकही सामना न हारता उपांत्य फेरी गाठणाऱ्या पाकिस्तान संघाची विजयी घोडदौड अखेर ऑस्ट्रेलियाने रोखली आहे. मॅथ्यू वेड (१७ चेंडूंत नाबाद ४१) आणि मार्कस स्टॉइनिस (३१ चेंडूंत नाबाद ४०) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी पाकिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव करत दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर १७७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने एक ओव्हर राखून हा सामना जिंकला. मॅथ्यू वेडने १९व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर शाहीन आफ्रिदीविरुद्ध सलग तीन षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान १९ व्या ओव्हरमध्ये तुफान फलंदाजी करत असलेल्या मॅथ्यू वेडचा कॅच सोडण्यात आला आणि तिथेच पाकिस्तानच्या हातून विजयदेखील निसटला. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमनेदेखील तो सुटलेला झेल सामन्यातील टर्निग पॉईंट होता असं म्हटलं आहे.
१७७ धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये २२ धावांची गरज होती. यावेळी मॅथ्यू वेडने लगावलेल्या एका फटक्यावर हसन अलीने कॅच सोडला आणि पुढील तीन चेंडूंवर वेडने शाहीन आफ्रिदीला सलग तीन षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर बोलताना बाबर आझमने म्हटलं की, “सामन्याच्या पहिल्या पूर्वाधात आम्ही ज्याप्रकारे सुरुवात केली त्यामुळे आम्हाला चांगली धावसंख्या उभारता आली. पण आम्ही शेवटी त्यांना खूप संधी दिली”. दरम्यान पाकिस्तान संघाने ज्या पद्धतीने उपांत्य फेरी गाठली त्याचा आपल्याला अभिमान असल्याचंही बाबरने म्हटलं.
“जर आम्ही तो कॅच घेतला असता तर कदाचित फरक पडला असता. पण आम्ही ज्याप्रकारे स्पर्धेत खेळलो त्यावरुन कर्णधार म्हणून समाधानी आहे,” असंही बाबरने सांगितलं. पुढे बोलताना त्याने सांगितलं की, “आम्ही आमच्या चुकांमधून शिकू अशी आशा आहे. जर आम्ही स्पर्धेत इतकं चांगलं खेळू शकलो आहोत तर नक्कीच यामुळे आत्मविश्वास वाढला असून यापुढेही अशाच पद्धतीने खेळत राहू”.
पाकिस्तानने २० षटकांत ४ बाद १७६ अशी धावसंख्या उभारली होती. मोहम्मद रिझवान (६७) आणि कर्णधार बाबर आझम (३९) या भरवशाच्या सलामीवीरांनी डावाची चांगली सुरुवात केली. त्यांनी ७१ धावांची सलामी दिल्यावर आझमला अॅडम झॅम्पाने बाद केले. रिझवानने मात्र उत्कृष्ट फलंदाजी सुरू ठेवताना या स्पर्धेतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याला डावखुऱ्या फखर झमानची (नाबाद ५५) तोलामोलाची साथ लाभली.
पाकिस्तानने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत गाठले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला शाहीन आफ्रिदीने पहिल्याच चेंडूवर पायचीत केले. डेव्हिड वॉर्नर (४९) आणि मिचेल मार्श (२८) यांनी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सावरले. मात्र, लेगस्पिनर शादाब खानने या दोघांसह स्टिव्ह स्मिथ (५) आणि ग्लेन मॅक्सवेल (७) या चौकडीला बाद करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले. पण स्टॉइनिस आणि वेड यांनी ८१ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.