टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. भारतानंतर झिम्बाब्वेनेही पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारताप्रमाणे झिम्बाब्वेनेही शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला पराभवाची धूळ चाखली. यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, भारतीय क्रिकेटप्रेमीही व्यक्त होत आहेत. झिम्बाम्बेने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावत १३० धावा केल्या होत्या. छोटं आव्हान असतानाही झिम्बाम्बेने पहिल्या चेंडूपासून पाकिस्तानला कडवी झुंज दिली. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी तीन धावांची गरज होती. मात्र पाकिस्तानला दोनच धावा मिळाल्या आणि झिम्बाम्बेने हा सामना जिंकला.
T20 World Cup: भारतापाठोपाठ झिम्बाब्वेचा पाकिस्तानला झटका; शेवटच्या चेंडूवर एका धावेनं थरारक विजय
झिम्बाब्वेने पाकिस्तानचा पराभव केल्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमी व्यक्त होत असून ट्विटरला अनेक ट्रेंड सुरु आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राही ट्विटरवर व्यक्त झाला आहे. “हा पराभव नाराजी करणारा नाही. हा नेहमीच झिम्बाब्वेचा सामना होता. शेजाऱ्यांसाठी आजचा वाईट दिवस आहे,” असं अमित मिश्राने म्हटलं आहे.
वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू बिशप यांनीही ट्विट करत झिम्बाबे संघाचं कौतुक केलं आहे. “झिम्बाब्वेसाठी जबरदस्त विजय. ते कधीच हार मानत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी स्तुती केली आहे.
भारतीय संघाची माजी खेळाडू अंजुम चोप्रानेही झिम्बाब्वे संघाचं अभिनंदन केलं आहे.
अनेक चाहतेही ट्विटरवर व्यक्त झाले असून या विजयानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याचं सांगत आहेत.
पाकिस्तानने टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंतचे दोन्ही सामने गमावले आहेत.