श्रीलंकेने जागतिक क्रिकेटला अप्रतिम फिरकी गोलंदाज दिले आहेत. या यादीतील पहिले नाव मुथय्या मुरलीधरनचे आहे. त्याने कसोटीत ८०० आणि वनडेमध्ये ५३४ विकेट्स घेतल्या. अनुभवी फलंदाजांनाही त्याची ऑफ स्पिन गोलंदाजी खेळताना घाम फुटला. यानंतर अजंथा मेंडिस आला. मेंडिस फलंदाजांसाठी बराच काळ अकल्पनीय कोडे राहिले. आता अजून एका ‘मिस्ट्री स्पिनर’ची या श्रीलंकेच्या टीममध्ये भर पडली आहे, त्याचे नाव महीश थीक्षणा असे आहे. हा स्पिनर तीन प्रकारचे चेंडू टाकून फलंदाजाची दांडी गुल करण्यात पटाईत आहे.

महीशने ४ दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पदार्पणातील एकदिवसीय सामन्यातच महीशने ४ विकेट्स घेत विरोधी संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली. या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज त्यांच्या कॅरम, गुगली आणि ऑफ-स्पिन या चेंडूंना खेळू शकले नाहीत. २१ वर्षीय महीश १० षटकांत ३७ धावा देऊन ४ विकेट घेण्यात यशस्वी ठरला. श्रीलंकेसाठी एकदिवसीय पदार्पण करताना महीशने सर्वोच्च कामगिरी करत इतिहासातील सर्व खेळाडूंना मागे टाकले.

हेही वाचा – IPL 2021 : स्पर्धा सुरू होण्यापूर्वी फ्रेंचायझींचा चढला पारा..! थेट BCCI कडं केली तक्रार

Mystery फिरकीपटू असल्यामुळे महीशची टी-२० विश्वचषकासाठी श्रीलंका संघात निवड झाली आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा फारसा अनुभव नाही. ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. यूएई आणि ओमानची खेळपट्टी संथ असू शकते. अशा परिस्थितीत महीश खेळणे मोठ्या फलंदाजांसाठीही अवघड असू शकते. त्याने आतापर्यंत ११ लिस्ट ए आणि २४ टी-२० खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर १९ आणि २२ विकेट्स आहेत.

टी-२० वर्ल्डकपसाठी श्रीलंकेचा संघ

दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डि सिल्वा, कुसल जेनिथ परेरा, दिनेश चंडीमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, चरित असलांका, वनिंदू हसरंगा, कामिंदू मेंडिस, चमिका करुणारत्ने, नुवान प्रदीप, दुश्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रेमा आणि लाहिरू मदुशनाका आणि महेश तीक्ष्णा.

राखीव – लाहिरू कुमार, बिनुरा फर्नांडो, अकिला धनंजया आणि पुलिना थरंगा.