मुंबई : दोन वर्षांच्या खंडानंतर प्रचंड उत्साहात रविवारी संपन्न झालेल्या १८व्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या ‘एलिट’ गटात पुरुषांमध्ये हायले लेमी (२ तास ७ मिनिटे ३२ सेकंद) आणि महिलांमध्ये अंचलेम हेमानोत (२ तास २४ मिनिटे १५ सेकंद) या इथिओपियाच्या धावपटूंनी विक्रमी वेळेसह जेतेपद पटकावले. यासह त्यांनी ४५ हजार अमेरिकी डॉलरचे बक्षीस (साधारण ३६ लाख ५८ हजार रुपये) आणि १५ हजार अमेरिकी डॉलर (साधारण १२ लाख १९ हजार रुपये) बोनसच्या रूपात आपल्या नावे केले. कडाक्याच्या थंडीतही ‘हर दिल मुंबई’चा नारा देत ५५ हजार धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एलिट’ गटात भारतीयांमध्ये पुरुष विभागात ऑलिम्पिकपटू आणि २०१७च्या आशियाई अजिंक्यपद मॅरेथॉनचा विजेता गोपी थोनाक्कलने बाजी मारली. गोपीने ४२.१९५ किलोमीटरचे अंतर २ तास १६ मिनिटे आणि ४१ सेकंदांत पूर्ण केले. सेनादलच्या मान सिंह (२ तास १६ मिनिटे ५८ सेकंद) आणि साताऱ्याच्या कालिदास हिरवे (२ तास १९ मिनिटे ५४ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. महिलांमध्ये पदार्पणवीर छवी यादव (२ तास ५० मिनिटे ३५ सेकंद) विजेती ठरली. आरती पाटीलला (३ मिनिटे ४४ सेकंद) दुसरे आणि रेणू सिंहला (३ तास १ मिनिट ११ सेकंद) तिसरे स्थान मिळवण्यात यश आले.

रविवारी झालेल्या मुंबई मॅरेथॉनच्या १८व्या पर्वातील ‘एलिट’ गटात आफ्रिकी देश इथिओपियाचे वर्चस्व पाहायला मिळाले. पुरुषांमध्ये अव्वल दहापैकी पाच, तर महिलांमध्ये अव्वल दहापैकी नऊ क्रमांक इथिओपियाच्या धावपटूंनी पटकावले. २०१६च्या बॉस्टन मॅरेथॉनच्या विजेत्या लेमीने विक्रमी वेळेसह पुरुषांमध्ये बाजी मारली. त्याने गेल्या (२०२०) मॅरेथॉनमधील विजेत्या इथिओपियाच्याच देरेरा हुरिसाचा २ तास ८ मिनिटे आणि ९ सेकंद अशा वेळेचा विक्रम मोडीत काढला. केनियाच्या फिलेमॉन रोनो (२ तास ८ मिनिटे आणि ४४ सेकंद) आणि इथिओपियाच्या हायलू झेवदू (२ तास १० मिनिटे २३ सेकंद) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पहिल्या ३० किलोमीटरमध्ये या तिघांत केवळ ९ सेकंदांचे अंतर होते, मात्र त्यानंतर लेमीने आपली गती वाढवली आणि एक मिनिटाहून अधिकच्या अंतराने जेतेपदावर मोहोर उमटवली.

महिलांमध्ये प्रथमच विजयमंचावरील तीनही धावपटूंनी २ तास व २५ मिनिटांहूनही कमी वेळेत ४२.१९५ किलोमीटरचे अंतर पार केले. हेमानोतने अग्रस्थान मिळवताना दशकभरापासूनचा विक्रम मोडीत काढला. यापूर्वी मुंबई मॅरेथॉनमध्ये एलिट महिलांत सर्वोत्तम वेळेचा विक्रम व्हॅलेंटिन किपकेटरच्या (२ तास २४ मिनिटे ३३ सेकंद) नावे होता. तिने २०१३च्या स्पर्धेत ही कामगिरी केली होती. यंदा महिलांमध्ये अव्वल आठही क्रमांक इथिओपियाच्या धावपटूंनी मिळवले. रहमा तुसा (२ तास २४ मिनिटे २२ सेकंद) आणि लेटेब्राहन हायले (२ तास २४ मिनिटे ५२ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

पारुल चौधरी, मुरली गावित अर्ध-मॅरेथॉनचे विजेते

’अर्ध-मॅरेथॉनच्या खुल्या महिला गटात पारुल चौधरी आणि पुरुष गटात मुरली गावित विजेते ठरले. पारुलने २१.०९७ किलोमीटरचे अंतर १ तास १५ मिनिटे आणि ७ सेकंदांत पूर्ण केले.

’नंदिनी गुप्ता (१ तास २४ मिनिटे १२ सेकंद) व पूनम सोनूने (१ तास २४ मिनिटे ५९ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

’पुरुषांमध्ये गावितने १ तास ५ मिनिटे २० सेकंदांत अर्ध-मॅरेथॉन पूर्ण करताना विजेतेपद मिळवले.

’अंकित देशवाल (१ तास ५ मिनिटे ४८ सेकंद) आणि दीपक कुंभार (१ तास ५ मिनिटे ५१ सेकंद) यांना मागे सोडले.

सरावात सातत्य राखल्याचा फायदा मला मॅरेथॉनमध्ये झाला. टोरंटो मॅरेथॉनमध्ये रोनोने मला नमवले होते, त्यामुळे अखेरचे काही किलोमीटर मी त्याला मागे वळून पाहत होतो. मुंबईतील वातावरणामुळे मला विक्रम मोडीत काढण्यात मदत झाली. – हायले लेमी

मुंबई मॅरेथॉनमध्ये प्रथमच सहभाग नोंदवताना जेतेपद मिळवल्याने आनंदी आहे. त्यातच वेळेचा नवीन विक्रम रचल्याने आनंद द्विगुणित झाला आहे. शर्यतीत अखेरच्या काही किलोमीटरमध्ये अधिक जोर लावला आणि त्याचा फायदा मला मिळाला. – अंचलेम हेमानोत

शर्यतीच्या ३० किमी अंतरानंतर पायाचे स्नायू खेचले गेल्याने अडथळा निर्माण झाला, पण शर्यत पूर्ण करण्याचा निर्धार मी केला होता. येथील वातावरण उष्ण असल्याने परिस्थिती आव्हानात्मक होती. त्यामुळे शर्यतीच्या अंतिम टप्प्यात अडथळा आला. – छवी यादव

तीन वर्षांनंतर पुनरागमन करताना जेतेपद पटकावल्याचा आनंद आहे. मी सुरुवातीचे ३० किलोमीटर योग्य पद्धतीने धावत होतो. मात्र, शर्यतीच्या अखेपर्यंत माझी गती कमी झाली. अखेर मॅरेथॉन जिंकण्यात मला यश मिळाले याचे समाधान आहे.- गोपी थोनक्कल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata mumbai marathon 2023 ethiopia runners dominates mumbai marathon 2023 zws
First published on: 16-01-2023 at 04:12 IST