दोहा : अमेरिका आणि वेल्स हे संघ सोमवारी ‘फिफा’ विश्वचषकाच्या लढतीत आमनेसामने येणार असून दोन्ही संघामध्ये चांगली चुरस पाहायला मिळणार आहे.अमेरिकेच्या संघाला गेल्या विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात अपयश आले होते. मात्र त्यानंतर त्यांना संघात काही बदल केले आणि यंदाच्या विश्वचषकासाठी ते पात्र ठरले. गेल्या सातपैकी चार विश्वचषक स्पर्धामध्ये अमेरिकेच्या संघाला साखळी फेरीच्या पुढे जाता आलेले नाही.वेल्सने १९५८ नंतर पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. ते केवळ दुसऱ्यांदाच विश्वचषकात सहभाग नोंदवणार आहेत. वेल्सने पात्रता सामन्यात ऑस्ट्रिया (२-१) आणि युक्रेनवर (१-०) विजय मिळवत विश्वचषकातील आपले स्थान निश्चित केले.

या सामन्यात अमेरिकेचे पारडे जड मानले जात आहे. कर्णधार ख्रिस्टियन पुलिसिककडून अमेरिकेला दर्जेदार कामगिरीची अपेक्षा असेल. क्लब फुटबॉलमध्ये चेल्सीचे प्रतिनिधित्व करणारा पुलिसिक पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवेल. पुलिसिकने यापूर्वी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमक दाखवली आहे. पुलिसिचने गेल्या २३ पात्रता सामन्यांमध्ये १२ गोल आणि सात गोलसाहाय्य केले.

दुसरीकडे, विश्वचषकासारख्या मोठय़ा व्यासपीठावर ७४ वर्षांनी वेल्सचे पुनरागमन झाले आहे. गेल्या काही वर्षांतील त्यांची चांगली लय पाहता ते इतर संघांना अडचणीत आणू शकतात. कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू गॅरेथ बेलचे योगदान वेल्ससाठी निर्णायक ठरू शकेल.

जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानी असलेल्या वेल्सने युरोपबाहेरील संघांविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. सात सामन्यांत वेल्सने तीन विजय मिळवले आणि तीन सामने बरोबरीत राखले. या सामन्यांत त्यांनी प्रतिस्पध्र्याना केवळ दोन गोल करू दिले. दोन्ही संघ ब-गटात इराण आणि इंग्लंडसोबत आहेत.
२ अमेरिका आणि वेल्स हे संघ यापूर्वी दोन वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. त्यामध्ये अमेरिकेने एका विजयाची नोंद केली, तर एक सामना बरोबरीत राहिला.

१अमेरिकेची युरोपीय संघांविरुद्धची कामगिरी निराशाजनक आहे. त्यांनी गेल्या नऊपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांना पाच पराभवांचा सामना करावा लागला, तर चार सामने बरोबरीत राहिले.

वेळ : मध्यरात्री १२.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्पोर्टस १८-१, १ एचडी, स्पोर्टस १८ खेल, जिओ सिनेमा