नवी दिल्ली : गतविजेत्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करत नेपाळवर अंतिम सामन्यात ४-० असा एकतर्फी विजय मिळवला आणि कुमार (१७ वर्षांखालील) ‘सॅफ’ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. साखळी सामन्यात नेपाळने भारताला ३-१ असे नमवले होते, त्याचा वचपादेखील भारताने काढला.
भारताने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत नेपाळवर दबाव निर्माण केला. १८ व्या मिनिटाला बॉबी सिंगने नेपाळच्या बचावाला भेदत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर वन्लालपेका गुइतेच्या साहाय्याने कोरोऊ सिंगने (३० व्या मि.) गोल करीत संघाची आघाडी दुप्पट केली. यानंतर ३९व्या मिनिटाला नेपाळचा कर्णधार प्रशांत लकसामच्या आक्रमक खेळामुळे त्याला लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांना १० खेळाडूंसह खेळावे लागले. मध्यांतरापर्यंत भारताने आपली ही आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या सत्रात भारताने आपला आक्रमक खेळ कायम ठेवला. गुइतेने (६३व्या मि.) नेपाळच्या खेळाडूंना चकवत गोल करत भारताला ३-० अशा सुस्थितीत पोहोचवले. यानंतर सामन्याच्या भरपाई वेळेत अमनने गोल झळकावत भारताच्या खात्यात चौथ्या गोलचा भरणा केला.