Team India Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेमध्ये पार पडला. भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. हा सामना बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ५ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दहाव्या सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. या विजयासह इंग्लंडने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे पराभूत झालेल्या भारतीय संघाच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
भारतीय संघ पहिल्यांदाच शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. युवा कर्णधार, युवा खेळाडू सर्वकाही नवीन होतं.मात्र, भारतीय खेळाडूंनी इंग्लंडच्या खेळाडूंना तोडीस तोड टक्कर दिली. भारतीय संघाने या सामन्यातील दोन्ही डावात मिळून ८३५ धावा केल्या.
भारतीय फलंदाजांनी या सामन्यातील दोन्ही डावात ५ शतकं झळकावली. हा सामना भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरला. कारण या याआधी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने एकाच सामन्यात ५ शतकं कधीच झळकावली नव्हती. तरीसुद्धा भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह भारतीय संघ ५ शतकं झळकावून पराभूत होणारा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच संघ ठरला आहे.
भारतीय संघाकडून फलंदाजी करताना पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतकं झळकावली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना केएल राहुल आणि ऋषभ पंतने शतक झळकावलं. ऋषभ पंतने या सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावलं. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान ठेवले.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडकडून बेन डकेटने सर्वाधिक १४९ धावांची खेळी केली. तर जॅक क्रॉलीने ६५, जो रूटने नाबाद ५३, बेन स्टोक्सने ३३ आणि जेमी स्मिथने नाबाद ४४ धावांची खेळी करत इंग्लंडला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयासह इंग्लंडनो कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.