Team India Playing 11 Prediction: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सर्वात महत्वाचा सामना आज दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे. भारतीय संघाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना यूएईविरूद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी झुंज देत ९ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली. या सामन्यात गोलंदाजांकडून दमदार कामगिरी पाहायला मिळाली होती. यूएईचा पहिला डाव अवघ्या ५७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलने ४.३ षटकात सामना संपवला. आता भारतासमोर पाकिस्तानला पराभूत करण्याचं आव्हान असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

यूएईविरूद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंकडून दमदार खेळ पाहायला मिळाला होता. त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही, अशी चिन्ह होती. अखेर संघाचा सहाय्यक प्रशिक्षक रायन डे डोशेटने प्लेइंग ११ बाबत मोठा खुलासा केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत रायन डे डोशेट म्हणाला, “आम्ही कोणतेही बदल करण्याची शक्यता खूप कमी आहे.” यावरून हे स्पष्ट झालं आहे की, भारतीय संघ गेल्या सामन्यात ज्या प्लेइंग ११ सह मैदानात उतरला होता. त्याच प्लेइंग ११ सह या सामन्यात उतरणार आहे.

असं जर झालं, तर अर्शदीप सिंगला पुन्हा एकदा प्लेइंग ११ मधून बाहेर बसावं लागेल. गेल्या सामन्यातही अर्शदीप सिंगला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली गेली नव्हती. आता प्लेइंग ११ मध्ये जर बदल केला जाणार नसेल, तर मग भारतीय संघ पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहसह मैदानात उतरू शकतो. त्याला साथ देण्यासाठी शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या हे दोघे वेगवान गोलंदाजी करताना दिसतील.

गेल्या सामन्यात संजू सॅमसनला संधी दिली गेली होती. पण तो आपल्या नेहमीच्या ठिकाणी फलंदाजीला येऊ शकला नव्हता. सलामीवीर म्हणून शुबमन गिल आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानात उतरली होती. तर संजू सॅमसनला मधल्या फळीत खेळण्याची संधी दिली गेली होती. या सामन्यातही गिल आणि अभिषेकची जोडी डावाची सुरूवात करताना दिसू शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती