cricket-blog-ravi-patki-670x200

भारताने विशाखापट्टणमला श्रीलंकेचा फडशा पाडला आणि टी-२० मालिका जिंकली. टी-२०  वर्ल्ड कप अगदी जवळ येऊन ठेपलेला असताना ह्या मालिकेतिल अनेक घटना प्रचंड आत्मविश्वास वाढवणाऱ्या आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे संघाला मिळालेली अष्टपैलूंची श्रीमंती. भारतीय खेळपट्टयांवर रैना,युवराज,जडेजा,पंड्या,अश्विन हे गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही मध्ये हातभार लाऊ शकतात. मंद खेळपट्टयांवर रैना दोन तीन कंजुष षटकं टाकू शकतो. परदेशी खेळपट्यांवर् जडेजा निष्प्रभ ठरतो तर भारतात तो चार षटकं बिशन बेदीचा उत्तराधिकारी असल्यासारखा वाटतो. पंडयाने मध्यमगति गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी या स्वरुपात थोड्या वेगळ्या खेळपट्ट्यांसाठी(पुण्याची होती तशी) एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. युवराजची भूमिका ‘बोलिंग ऑलराउंडर’ अशी धोनीने ठरवलेली दिसते. क्रिकेट समालोचक आणि समीक्षक बोलायला हे तयार नसले तरी युवराजला स्पिन गोलंदाजी समोर सेट व्हायला बराच वेळ लागतो हे सत्य आहे. ज्या गोलंदाजाचा चेंडू बैट वर लवकर येतो त्या गोलंदाजा समोर युवराज आरामात खेळतो.पण स्पिनर्स समोर त्याला त्रास होतो आणि धावा होता होत नाहीत हे अनेकदा(मागची टी-२० वर्ल्ड कप फाइनल हे एक उदाहरण) दिसून आलय. आयपीएल मध्ये सुद्धा त्याच्या स्पिनर्स विरुद्ध पटकन धावा होत नाहीत हे धोनीला चांगले माहित आहे. त्यामुळे कोहली संघात आल्यावर खेळपट्टीचा नूर बघून पंड्याला घ्यायचे का युवराजला हे सामन्यागणिक धोनी ठरवेल असे वाटते. युवराज च्या चाहत्यांना ही गोष्टं आवडणार नसली तरी पंड्या आणि युवराज मध्ये छापा काटा होईल असे वाटते. रहाणे पाच नंबरला फिक्स वाटतोय.

दुसरी विलक्षण आल्हादायक गोष्टं म्हणजे बुमराह चा उदय. शेवटच्या षटकात नेम धरून एका मागोमाग एक बुंध्यात यॉर्कर टाकणारा गोलंदाज भारताकडे कधी होता हे आठवत नाही. पगारदार माणसाला महिन्याचा शेवटचा आठवडा जसा ओढ़ाताणित काढावा लागतो तसे काहीसे भारतीय कर्णधाराचे शेवटच्या षटकांत होते. पण बूमराहच्या रुपात धोनीला पे कमीशन सारखी छान पगारवाढ झाली आणि शेवटच्या षटकांत भरपूर श्रीशिल्लक असलेल्या पगारदारासारखा धोनी एकदम निवांत झाला. आता ‘मेरे पास बुमराह है’ असे ग्राउंडवर तो स्वत:ला  सांगून वारंवार चिमटे काढत असेल असे सारखे वाटते. बूमराहच्या अचूकतेवर कुणीही फिदा होईल. बोरिस बेकर च्या वेगवान सर्विस मुळे तो ‘बूम बूम बेकर’ झाला,अफ्रिदीच्या वेगवान फ्लॅट सिक्सर्स मुळे तो ‘बूम बूम अफ्रीदी’ झाला. आता स्टंपतोड़ यॉर्करच्या सरबत्तीमुळे आपला गोलंदाज ‘बूम बूम बूमराह’ झाला आहे. टाइम टू सेलिब्रेट!!

– रवि पत्की