विश्वातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला बुधवारी मेलबर्न येथील विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवले. जोकोव्हिचच्या व्हिसामध्ये काही तरी चूक असल्याचे निष्पन्न झाल्याने तब्बल दोन तास त्याला विमानतळावरच थांबवण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रेलियातील वृत्तवाहिन्यांनी दिली.

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला १७ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू तसेच पदाधिकारी, चाहते या सर्वांनाच लसीकरणाचा पुरावा सादर करणे अनिवार्य आहे. जोकोव्हिचने मात्र एकदाही लस घेतल्याचे सिद्ध केलेले नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या स्पर्धेतील समावेशाबाबत संभ्रम कायम होता. अखेर मंगळवारी आपल्याला वैद्यकीय सूट मिळाल्याचे जोकोव्हिचने जाहीर केले आणि बुधवारी तो मेलबर्नच्या दिशेने रवाना झाला. सध्या जोकोव्हिच विलगीकरण करत असून त्याला मोबाईलचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे समजते.

दरम्यान, जोकोव्हिचसाठी स्पर्धेच्या नियमांत बदल केल्यामुळे आयोजकांवर चोहीकडून टीकेचा भडिमार होत आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी जोकोव्हिचला वैद्यकीय सूट मिळाल्याचा पुरावा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रमाणपत्रासाठी दिलेले कारण वैध न वाटल्यास जोकोव्हिच स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही, असेही मॉरिसन यांनी सांगितले. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी कोणते वळण घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अमनला प्रवेश नाकारला; क्रीडा मंत्रालय नाराज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी दिल्ली : भारताचा टेनिसपटू अमन दहियाला कनिष्ठ गटात चुकीच्या पद्धतीने प्रवेशिका नाकारल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या संयोजकांवर नाराजी प्रकट केली आहे. भारतात ३ जानेवारीपासून कनिष्ठ वयोगटाच्या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अमितचे लसीकरण झाले नाही. याच कारणास्तव त्याला प्रवेश नाकारण्यात आला आहे. ‘‘जोकोव्हचला दोन लसीकरण मात्रांच्या नियमातून सूट देण्यात आली. मात्र १७ वर्षीय अमितला लसीकरणाअभावी प्रवेश नाकारण्यात आला. ही भारताला दिलेली वागणूक अयोग्य आहे,’’ अशा शब्दांत क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने टीका केली आहे.