भारताचा इंग्लंड दौऱ्यावरील शेवटचा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर क्रिकेट चाहते निराश झाले होते. आता हा सामना कधी होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. अशा परिस्थितीत आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान रद्द झालेल्या मँचेस्टर कसोटीच्या जागी २०२२मध्ये भारत एजबस्टनमध्ये एक कसोटी सामना खेळणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्यात या कसोटीसंबंधी निर्णय झाला आहे. भारतीय संघाला पुढील वर्षी एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करायचा आहे आणि त्या दरम्यान हा कसोटी सामनाही खेळला जाईल.

हेही वाचा – IPL 2022 : ठरलं तर..! चेन्नई सुपर किंग्ज धोनीसह ‘या’ ४ खेळाडूंना करणार रिटेन

पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या कसोटीपर्यंत भारतीय संघ २-१ने आघाडीवर होता, परंतु या काळात भारतीय शिबिरात करोना संसर्गाची प्रकरणे येऊ लागली. चौथ्या कसोटीच्या मध्यातच संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफचे इतर सदस्य संक्रमित झाले. त्याचवेळी, १० सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणाऱ्या शेवटच्या कसोटीच्या एक दिवस आधी संघाच्या फिजिओला संसर्ग झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी शेवटची कसोटी खेळण्यास नकार दिला. यानंतर, सामना सुरू होण्याच्या सुमारे दोन तास आधी तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांनी भारतीय खेळाडूंची समजूत काढण्याचा आणि हा सामना खेळण्यासाठी त्यांना राजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कर्णधार विराट कोहलीसह भारतीय संघातील खेळाडूंनी या सामन्यात खेळण्यासाठी नकार दर्शवला होता.