IND vs AUS 4th Test Match Updates:भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस पार पडला. या सामन्यात विराट कोहलीने दमदार खेळी करत आपल्या कसोटी शतकाचा दुष्काळ संपवला. परंतु अवघ्या १४ धावांनी त्याचे व्दिशतक हुकले. तसेच भारताने पहिल्या डावाच्या जोरावर ९१ धावांची आघाडी घेतली. या दरम्यान विराट आणि शुबमनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
विराटने गिलचा पिरगळला हात –
हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली शुबमन गिलचा हात पिरगळताना दिसतोय. विराट कोहली शुबमन गिलकडे जातो आणि त्याचा हात धरून तो पिरगळतो. विराट वारंवार गिलचा हात पिरगळतो, त्यादरम्यान गिल शांतपणे उभा असलेला दिसत आहे. या दोघांचे हे कृत्य मस्करीत चालले होते. ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.
बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथ्या सामन्यात शुबमन गिलने देखील शतक झळकावले आहे. त्याने १२८ धावांची खेळी केली. गिलने या खेळीत १२ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याचा यंदाचा फॉर्म उत्कृष्ट राहिला आहे. टी-२० मध्ये शतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतर आता कसोटीतही शतक झळकावून तो संघाच्या प्रमुख खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला –
अहमदाबाद कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या बिनबाद तीन धावा आहे. मॅथ्यू कुहनेमन खाते न उघडता क्रीजवर आहे. त्याचवेळी ट्रॅव्हिस हेड तीन धावा करून त्याच्यासोबत खेळत आहे. भारताकडे अजूनही ८८ धावांची आघाडी आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी कांगारू संघाला छोट्या धावसंख्येवर गुंडाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. भारतीय संघाने पाचव्या दिवशीच्या खेळपट्टीवर चमत्कार घडवला तर तो सामना जिंकू शकतो. सपाट खेळपट्टीवर हा सामना ड्रॉच्या जवळ आहे.
भारताने पहिला डाव ५७१ धावांवर आटोपला –
भारताने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाने ९१ धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक १८६ धावा केल्या. त्याचवेळी शुबमन गिलने १२८ धावांची खेळी केली. अक्षर पटेलनेही ७९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. या डावात भारताच्या नऊ विकेट पडल्या, पण श्रेयस अय्यर दुखापतीमुळे फलंदाजीला येऊ शकला नाही. त्यामुळे भारताचा डाव नऊ विकेट्सवर संपला.