Asia Cup 2025 IND vs PAK Impact Player of the match: भारताने आशिया चषक सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत सुपर फोर टप्प्याला दणक्यात सुरूवात केली. पाकिस्तानने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १८.५ षटकांत सहज विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांची कामगिरी या सामन्यात सुरूवातीला साधारण राहिली. पण अखेरीस त्यांनी पुनरागमन करत पाकिस्तानला फार मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. या सामन्यानंतर आता बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअर मेडल देतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे.
पाकिस्तानने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलने कमालीची सुरूवात केली. या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचली. अभिषेक ७४ धावांची खेळी केली. तर शुबमन ४७ धावांवर बाद झाल्याने अवघ्या ३ धावांसाठी त्याचं अर्धशतक हुकलं. यानंतर सूर्यकुमार यादव खातं न उघडता बाद झाला.
BCCIने शेअर केला भारताच्या ड्रेसिंग रूममधील व्हीडिओ
संजू सॅमसनही १३ धावा करत बाद झाला. यानंतर हार्दिक पंड्याने तिलक वर्माला चांगली साथ दिली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तिलक वर्माने या सामन्यात महत्त्वाच्या क्षणी मोठे फटके खेळत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. तिलकने षटकार आणि चौकार लगावत १९व्या षटकातच सामना जिंकून दिला. तिलकने १९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ३० धावांची प्रभावी खेळी केली.
तिलक वर्माच्या प्रभावी खेळीसह त्याला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचं इम्पॅक्ट प्लेअर मेडल देण्यात आलं. बीसीसीआयने आशिया चषकातील सर्व सामन्यांनंतर प्लेअर ऑफ द मॅच मेडल देण्याची जबाबदारी सर्व सपोर्ट स्टाफला दिली आहे, जो खूप कौतुकास्पद निर्णय आहे. त्यामुळे या सामन्यात भारताच्या कोचिंग स्टाफमधील महत्त्वाचा भाग असलेला रघू याने मेडल दिलं.
रघू राघवेंद्र हा भारताच्या खेम्यातील थ्रोडाऊन स्पेशालिस्ट आहे आणि गेली अनेक वर्ष तो भारतीय संघाचा भाग आहे. रघू हा कर्नाटकातील कुमटा येथील आहे. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची विशेष आवड होती. २००८ मध्ये त्यांना बीसीसीआयने टीम इंडियाचा थ्रो डाऊन एक्सपर्ट म्हणून संघात संधी दिली आणि तेव्हापासून ते संघाचा भाग आहेत.
रघूने इम्पॅक्ट प्लेअर मेडलचा विजेता घोषित करण्यापूर्वी प्रेरणादायी भाषण दिलं. त्याचं भाषण ऐकून टीम इंडियातील सर्वांनी त्याचं कौतुक केलं. यानंतर त्याने तिलक वर्माचं नाव घेत त्याला मेडल घेण्यासाठी बोलावलं. तिलकने येताच मजेत खाली वाकून त्याच्या पाया पडला आणि मग मेडल स्वीकारलं.