दम्बुला येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज तिलकरत्ने दिलशान एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाला दिलेल्या अतुल्य योगदानाबद्दल २८ ऑगस्टला होणारा हा सामना ३९ वर्षीय दिलशानला समर्पित करण्यात येणार आहे, असे श्रीलंका क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. दिलशानने याबाबत तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आक्रमक फलंदाज दिलशानने ऑक्टोबर २०१३मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने ८७ सामन्यांत ५४९२ धावा आणि ३९ बळी मिळवले आहेत. रविवारी तो कारकीर्दीतील ३३०वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत १०,२४८ धावा केल्या असून, १०६ बळी मिळवले आहेत.

 

डकवर्थ-लुइस नियमानुसार इंग्लंड विजयी

साऊदम्प्टन : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने डकवर्थ-लुइस नियमांनुसार ४४ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडपुढे २६१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची ३ बाद १९४ अशी स्थिती असताना पाऊस आला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला, तेव्हा इंग्लंडचा संघ नियमानुसार ४४ धावांनी पुढे होता.

नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला कर्णधार अझर अलीने चांगली सुरुवात करून दिली. अलीने ९ चौकारांच्या जोरावर ८२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. बाबर आझम (४०) आणि सर्फराझ अहमद (५५) यांनीही चांगली फलंदाजी केल्यामुळे पाकिस्तानला २६० धावा करता आल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला पाचव्या षटकात पहिला धक्का बसला, पण त्यानंतर जेसन रॉय (६५) आणि जो रूट (६१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. हे दोघे बाद झाल्यावर इऑन मॉर्गन (नाबाद ३३) आणि बेन स्टोक्स (नाबाद १५) यांनी धावगती कायम ठेवल्यामुळे इंग्लंडला हा सामना जिंकता आला.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tillakaratne dilshan retirement
First published on: 26-08-2016 at 03:42 IST