एकदिवसीय मालिकेत शुभ्र यश मिळवल्यानंतर आता दोन ट्वेन्टी-२० मालिकेचे जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यामध्ये पहिला ट्वेन्टी-२० सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेत कुचकामी ठरलेला झिम्बाब्वेचा संघ ट्वेन्टी-२० सामना जिंकण्यासाठी जिवाचे रान करणार आहे.
भारताने एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी करत संघात योग्य समन्वय असल्याचे दाखवून दिले आहे. फलंदाजीमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेकडून मोठय़ा अपेक्षा असतील. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ ढेपाळताना दिसत असताना केदार जाधवने अप्रतिम शतकाचा नमुना पेश केला होता, या शतकानंतर त्याच्याकडून सर्वाच्याच अपेक्षा उंचावलेल्या आहेत. मुरली विजय, मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे यांना अजूनही छाप पाडता आली नसल्याने त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी असेल. तीन एकदिवसीय सामन्यात मिळून रॉबिन उथप्पाला केवळ ४५ धावा करता आल्या होत्या. त्याच्याऐवजी युवा संजू सॅमसनला पदार्पणाची संधी मिळू शकते. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी हे मध्यमगती गोलंदाजांचे गुणवान त्रिकुट आहेत. फिरकीमध्ये हरभजन सिंगकडे चांगला अनुभव असून अक्षर पटेल हा सातत्याने भेदक मारा करत आहे.
झिम्बाब्वेच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव पाहायला मिळाला आहे. कर्णधार एल्टन चिगुंबुराकडे मोठी खेळी साकारण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर युवा खेळाडूंकडे चांगली गुणवत्ता आणि ऊर्जा असून भारताचा धक्का देण्याची कुवत नक्कीच त्यांच्यामध्ये आहे.
भारतीय संघाने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात शेवटचा ट्वेन्टी-२० सामना खेळला होता. मात्र त्या सामन्यातील बहुतांशी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत चमकादार कामगिरी करणाऱ्या केदार जाधव, मनीष पांडे, संदीप शर्मा यांना पदार्पणची संधी मिळू शकते. दुसरीकडे पाकिस्तान दौऱ्यात झिम्बाब्वेला दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र दोन्ही लढतींमध्ये शेवटच्या चेंडूवर सामन्याचा निकाल लागला होता. त्यामुळे झिम्बाब्वेचा संघ भारताला कडवी टक्कर देण्यासाठी सक्षम आहे. मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे क्रेग इरव्हाइन एकदिवसीय मालिकेत खेळू शकला नव्हता. ट्वेन्टी-२० मालिकेत तो झिम्बाब्वे संघाचा महत्त्वपूर्ण भाग असणार आहे. चार्ल्स कोवेन्ट्री आणि ख्रिस्तोफर मोफू या अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झिम्बाब्वेसाठी जमेची बाजू आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवरच ट्वेन्टी-२० सामने होणार असल्याने स्विंगला पोषक संथ खेळपट्टी असणार आहे.
प्रमुख खेळाडूंच्या उपस्थितीत खेळताना एकदिवसीय मालिकेत भारतीय खेळाडूंना विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संघ
भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, मनोज तिवारी, हरभजन सिंग, केदार जाधव, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, अक्षर पटेल, अंबाती रायुडू, संदीप शर्मा आणि मोहित शर्मा.
झिम्बाब्वे : एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), रेगिस चकाब्व्हा (यष्टिरक्षक), चामू चिभाभा, ग्रॅमी क्रेमर, नेव्हिले माडझिव्हा, हॅमिल्टन मसाकाझा, रिचमाँड मुतुम्बामी, टिनाश पानयांगारा, सिकंदर रझा, डोनाल्ड तिरिपानो, प्रॉस्पर उत्सेया, ब्रायन व्हिटोरी, माल्कम वॉलर आणि सीन विल्यम्स.
वेळ : दुपारी ४.३० वा. पासून.
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट वाहिनीवर.

झिम्बाब्वे दौरा हा माझ्यासाठी सुवर्णसंधी ठरली. हा दौरा आव्हानात्मक असणार याची मला कल्पना होती, त्यामुळे त्यानुसार मी सराव करण्यावर भर दिला होता. प्रत्येक सामन्यामध्ये धावा करणे सोपे नसते, त्यासाठी झगडावे लागते. संघाला जिंकवून देण्यात वाटा उचलणे हे माझे काम आहे आणि ते करण्यावरच माझा भर असेल.
– केदार जाधव, भारताचा फलंदाज

More Stories onमॅच
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today first match india vs zimbabwe
First published on: 17-07-2015 at 03:59 IST