ऑलिम्पिकमधील पहिले आणि एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक अभिनव बिंद्राने २००८मध्ये मिळवले. २००४पासून २०१२पर्यंत प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी हा हमखास पदक जिंकून देणारा प्रकार होता. २०१६चे रिओ ऑलिम्पिक मात्र अपवाद ठरले. पण आतापर्यंतची चार पदकांची कमाई आणि गेल्या चार वर्षांतील नेमबाजांची दिमाखदार कामगिरी पाहता टोक्यो ऑलिम्पिकमधील आशा उंचावतात. यंदा नेमबाजीतून भारताला किमान चार पदकांची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतिहास : स्वातंत्र्योत्तर काळात नेमबाजीचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी ५० वर्षांचा काळ लोटला. १९५२मध्ये डॉ. हरिहर बॅनर्जी हे पहिले नेमबाज ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले. १९६० ते १९८० या कालखंडात डॉ. कर्णी सिंग हे तब्बल पाच ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सहभागी झाले. १९९६मध्ये जसपाल राणा आणि मानशेर सिंग यांनीही भारताचे प्रतिनिधित्व केले. पण अंजली भागवतने २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत अंतिम फेरी गाठून सर्वप्रथम आशा निर्माण केल्या. त्यानंतर २००४च्या अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये डबल ट्रॅप प्रकारात राज्यवर्धन सिंह राठोडने ‘रौप्यक्रांती’ करीत नेमबाजीत पदक जिंकता येते, हे सिद्ध केले. मग २००८मध्ये बिंद्राने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला. त्यानंतर २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये विजय कुमारने रौप्य आणि गगन नारंगने कांस्य अशी दोन पदके भारताला जिंकून दिली. २०१६मधील अनपेक्षित नैराश्य नेमबाजीसाठी धोक्याची घंटा ठरले. सर्वत्र टीकेचा भडिमार झाल्यामुळे भारताच्या कामगिरीचे विश्लेषण करून संघटनेकडून पुढील ऑलिम्पिकसाठी रणनीती ठरवण्यात आली. त्याची फलश्रुती गेल्या काही वर्षांतील विश्वचषक स्पर्धामध्ये दिसून येत आहे.

अपेक्षा

भारताच्या आव्हानाची भिस्त युवा नेमबाज मनू भाकर, सौरभ चौधरी आणि राही सरनोबतवर प्रामुख्याने असेल. मनू-सौरभचे मिश्र दुहेरीतील पदक निश्चित मानले जात आहे. याशिवाय  दिव्यांश सिंह पनवार, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यांच्याकडूनही पदकाची अपेक्षा करता येऊ शकेल.

आतापर्यंतची पदके

सुवर्ण १ रौप्य २ कांस्य १ एकूण ४

पदकविजेते

राज्यवर्धन सिंह राठोड (अ‍ॅथेन्स २००४) रौप्यपदक

अभिनव बिंद्रा (२००८ बीजिंग) सुवर्णपदक

विजय कुमार (२०१२ लंडन) रौप्यपदक

गगन नारंग (२०१२ लंडन) कांस्यपदक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo olympics 2021 india likely to win at least four medals in shooting zws
First published on: 19-07-2021 at 01:14 IST