भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षभरात टी-20 क्रिकेटमध्ये सातत्याने शानदार कामगिरी करत आहे. त्याच्या या दमदार कामगिरीचा फायदा टी-२० क्रमवारीत सुद्धा झाला आहे. सूर्याकडे संपूर्ण मैदानाच्या सर्व दिशांना शॉट लगावण्याची क्षमता आहे. ज्यामुळे त्याला टी-२० क्रिकेटचा नवीन मिस्टर ३६० म्हणून ओळखले जात आहे. तसेच सध्या सर्व क्रीडा विश्वात त्याच्या नावाची चर्चा आहे. अशात ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने सूर्यकुमारबद्दल एक मोठं विधान केलं आहे.
अलीकडेच माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मूडी यांनी सूर्यकुमार यादवची तुलना वेस्ट इंडिजचा दिग्गज विव्ह रिचर्ड्सशी केली. सूर्याची फलंदाजी त्याला विव्ह रिचर्ड्सची आठवण करून देत असल्याचे मूडीचे म्हणणे आहे. स्पोर्ट्सतकला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, जेव्हा टॉम मूडीला टी-२० क्रिकेटमधील त्याच्या आवडत्या फलंदाजाचे नाव विचारण्यात आले, तेव्हा त्याने सूर्यकुमार यादवचे नाव सांगितले.
टॉम मूडी म्हणाला ‘सूर्यकुमार यादव, तो ज्या पद्धतीने खेळतो, ते मनमोहक आहे. हे मला खूप आठवण करून देते… मी तरुण क्रिकेटपटू असताना व्हिव्हियन रिचर्ड्स आवडायचे. असा खेळाडू जो खेळावर एकटाच नियंत्रण ठेवतो.”
हेही वाचा – Team India: दाऊदने टीम इंडियाला दिली होती ‘ही’ ऑफर; तेव्हा काय म्हणाले होते कपिल देव घ्या जाणून
टी-२० मधील त्याचा फॉर्म पाहून बीसीसीआयनेही त्याची जबाबदारी वाढवली आहे. त्याला अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. तसेच न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी त्याला ही जबाबदारी पुन्हा देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत सूर्याने आपल्या टी-२० कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने मालिका २-१ अशी जिंकली.