Riyan Parag Controversies In Cricket: भारतीय संघातील स्टार युवा अष्टपैलू खेळाडू रियान पराग आज आपला २४ वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही वर्षात त्याने खेळाचा दर्जा चांगलाच उंचावला आहे. राजस्थान रॉयल्स संघात फ्लॉप होत असतानाही त्याला सातत्याने संधी दिली जात होती. त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. पण राजस्थान रॉयल्सने त्याच्यावरील विश्वास कायम ठेवला.

गेल्या २ हंगामात त्याने दमदार फलंदाजी केली आहे. या कामगिरीच्या बळावर गेल्या हंगामात संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी रियान परागकडे सोपवली गेली होती. रियान आपल्या कामगिरीसह वादांमुळेही नेहमीच चर्चेत राहिला आहे. दरम्यान जाणून घ्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील गाजलेले वाद .

अंपायरसोबत वाद

आयपीएल २०२५ स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात रियान परागचा अंपायरसोबत वाद झाला होता. राजस्थानला २१८ धावांचा पाठलाग करायचा होता. त्यावेळी राजस्थानचे १२ धावांवर २ फलंदाज माघारी परतले होते. या सामन्यात गोलंदाजाने टाकलेला चेंडू रियानच्या बॅटला लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला होता. त्यावेळी पंचांनी बाद घोषित केलं. रियानने लगेचच डीआरएसची मागणी केली. डीआरएसमध्येही स्पाईक झाल्याचं दिसून आलं. पण रियान पराग या निर्णयावरून नाराज होता. त्याच्या म्हणण्यानुसार,चेंडू बॅटच्या जवळ आला, त्यावेळी बॅट जमिनिला लागल्याने आवाज झाला होता. मैदानाबाहेर जाण्यापू्वी त्याचा आणि अंपायरचा चांगलाच वाद रंगला.

फॅनचा मोबाईल फेकला

आपला आवडता क्रिकेटपटू दिसला की, क्रिकेट चाहते फोटो घेण्यासाठी किंवा ऑटोग्राफ घेण्यासाठी धावतात. दरम्यान आयपीएल २०२५ स्पर्धा सुरू असताना, ग्राऊंड स्टाफमधील सदस्यांनी रियान परागकडे सेल्फी घेण्याची मागणी केली होती. त्याने सेल्फी दिला, पण त्यानंतर त्याने तो फेकून दिला. हा वाद देखील तुफान चर्चेत राहिला होता.

यूट्यूब सर्ट हिस्ट्री

आयपीएल २०२४ स्पर्धेदरम्यान रियान परागचा आणखी एक वाद तुफान गाजला होता. तो म्हणजे त्याचा यूट्यूब सर्च हिस्ट्रीचा वाद. तो आपल्या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह स्ट्रिमिंग करत होता. त्यावेळी त्याने कॅमेरा आपल्या स्क्रिनकडे वळवला. त्यावेळी त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये असं काही लिहिलं होतं,जे तुफान चर्चेत राहिलं. त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये अनन्या पांडे हॉट आणि सारा अली खान हॉट असे शब्द सर्च केले गेलेले होते. ही बाब त्याच्या लक्षात येताच त्याने तातडीने लाईव्ह स्ट्रिम बंद केलं. पण स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील वाद

रियान परागने २०२३ मध्ये झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला होता. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने सलग ७ अर्धशतकं झळकावली होती. असा पराक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला होता. दरम्यान ७ वे अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने वादग्रस्त सेलिब्रेशन केलं होतं. त्याने इशारा करत, मीच इथे बेस्ट आहे,माझ्यासारखं कोणीच नाही. असं म्हटलं होतं. यावरूनही त्याला प्रचंड ट्रोल केलं होतं.