लुइस सुआरेझचे दोन गोल आणि अन्य तीन गोल करण्यात मोलाचा वाटा उचलल्यामुळे लिव्हरपूलने टॉटनहॅम हॉट्सपरचा ५-० असा धुव्वा उडवत इंग्लिश प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. दुसऱ्या स्थानासाठी चेल्सी, लिव्हरपूल आणि मँचेस्टर सिटी यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
लिव्हरपूलचे पहिल्यांदाच नेतृत्व सांभाळताना सुआरेझने आपल्यातील अप्रतिम कामगिरीचा नजराणा पेश केला. दोन गोल करत त्याने गेल्या तीन सामन्यांतील आपली गोलसंख्या आठवर तर या मोसमातील गोलसंख्या १७ वर नेली. तसेच जॉर्डन हेन्डरसन, जॉन फ्लॅनागन आणि रहीम स्टर्लिग यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या विजयामुळे लिव्हरपूलने अव्वल स्थानावर असलेल्या अर्सेनलला धोक्याचा इशारा दिला आहे.
या मोसमात विजयासाठी धडपडणाऱ्या गतविजेत्या मँचेस्टर युनायटेडने अॅस्टन व्हिलाचा ३-० असा पराभव करत आपली गाडी रूळावर आल्याचे दाखवून दिले. एव्हरटन आणि न्यूकॅसल युनायटेडकडून पराभूत झाल्यानंतर घरच्या मैदानावर सलग तीन सामने गमावण्याची मँचेस्टर युनायटेडला भीती वाटत होती. मात्र डॅनी वेलबॅकने तीन मिनिटांत केलेले दोन गोल आणि टॉम क्लेव्हरली याने केलेला एक गोल यामुळे मँचेस्टर युनायटेडने सहज विजयाची नोंद केली. विजयानंतरही मँचेस्टर युनायटेड आठव्या स्थानी आहे. या मोसमातील पहिला टप्पा जवळपास संपत आला असला तरी गुणतालिकेत वरचे स्थान पटकावण्यासाठी मँचेस्टर युनायटेडला दुसऱ्या टप्प्यात चमकदार कामगिरी करावी लागेल.
दरम्यान, चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बार्सिलोनाचा मुकाबला बुधवारी रात्री मँचेस्टर सिटीविरुद्ध होणार आहे. गतविजेत्या बायर्न म्युनिकला अर्सेनलच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मँचेस्टर युनायटेडची लढत ऑलिम्पियाकोसशी तर चेल्सीचा सामना गालाटासारेविरुद्ध होईल.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2013 रोजी प्रकाशित
लिव्हरपूलचा पाँच का पंच’!
लुइस सुआरेझचे दोन गोल आणि अन्य तीन गोल करण्यात मोलाचा वाटा उचलल्यामुळे लिव्हरपूलने टॉटनहॅम हॉट्सपरचा ५-० असा धुव्वा उडवत इंग्लिश प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.

First published on: 17-12-2013 at 03:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tottenham hotspur vs liverpool final score 0