नवी दिल्ली : क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तीनही प्रारूपांत सातत्याने खेळत राहणे अवघड आहे. सततच्या क्रिकेटमुळे शरीरावर ताण पडतो. त्यामुळे कारकीर्दीत एक टप्पा असा येतो, जेव्हा तुम्हाला निवडक सामने आणि स्पर्धांना प्राधान्य द्यावे लागते, असे मत भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने व्यक्त केले.

बुमराला गेल्या काही काळात विविध दुखापतींचा सामना करावा लागला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात खेळत असताना बुमराला पाठदुखीने सतावले. त्यामुळे त्याला तीन महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहावे लागले. तसेच गोलंदाज म्हणून बुमराचे महत्त्व लक्षात घेता, भारतीय संघाला त्याच्या कार्यभार व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे लागत आहे. याच कारणास्तव त्याला कसोटी संघाचे कर्णधारपद देणेही निवड समितीने टाळले.

‘‘क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत दीर्घकाळ खेळणे कोणत्याही खेळाडूला अवघडच जाते. मी बऱ्याच वर्षांपासून तिन्ही प्रारूपांत खेळत आहे. मात्र, काही काळाने आव्हाने वाढत जातात. तुमचे शरीर कोणत्या स्थितीत आहे आणि कोणत्या स्पर्धा सर्वांत महत्त्वाच्या आहेत, याचा तुम्हाला विचार करावा लागतो,’’ असे बुमरा म्हणाला.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कला दिलेल्या ‘पॉडकास्ट’ मुलाखतीत बुमराने विविध विषयांवर चर्चा केली. बुमराने आतापर्यंत ४५ कसोटी, ८९ एकदिवसीय आणि ७० ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने १४० हून अधिक ‘आयपीएल’ सामनेही खेळले आहेत.

‘‘कारकीर्दीत तुम्ही जसे पुढे जाता, तसे तुम्हाला निवडक स्पर्धा आणि सामन्यांना प्राधान्य द्यावे लागते. तुम्हाला शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. मैदानावर असताना मला १०० टक्के देऊन खेळायला आवडते. आता शारीरिकदृष्ट्या मी तंदुरुस्त आहे. मात्र, मी कोणतेही लक्ष्य समोर ठेवलेले नाही,’’ असे बुमराने सांगितले. २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाकडून खेळायला आवडेल असेही बुमरा म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंड दौरा आव्हानात्मक

भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यात भारताच्या गोलंदाजीची भिस्त बुमरावरच असेल. ‘‘इंग्लंडमध्ये खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. मला ‘ड्युक्स’च्या चेंडूने गोलंदाजी करायला आवडते. इंग्लंडमधील हवामान आणि परिस्थिती सतत बदलत असते. त्यामुळे काही वेळा चेंडूचा टणकपणा कमी होतो. अशा वेळी चेंडू स्विंग करणे हे मोठे आव्हान ठरते,’’ असे बुमराने नमूद केले.