शिवशक्ती विरुद्ध डॉ. शिरोडकर हा सामना अपेक्षेप्रमाणेच सुवर्णा बारटक्के आणि स्नेहल साळुंखे यांच्या चढायांच्या जुगलबंदीने पहिल्या सत्रात रंगला, परंतु उत्तरार्धात दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेत गुण घेण्याचा प्रयत्न न केल्यामुळे हा सामना ६-६ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे ५-५ चढायांच्या टायब्रेकपर्यंत लांबला. शिवशक्तीने सुजाता काळगावकर आणि स्नेहल साळुंखे या दोन महत्त्वाच्या चढायापटूंसाठी फक्त एका गुणाचे गौरी वाडेकररूपी सावज उभे केले. ही त्यांची चाल विलक्षण यशस्वी ठरली. शिवशक्तीकडून अखेरची चढाई ऋतुजा देऊळकरने केली. तिची पकड झाली असती तर सामना सडन डेथपर्यंत लांबला असता, परंतु ऋतुजाने एक गुण घेत संघाच्या विजयावर ६-४ असे शिक्कामोर्तब केले. त्यामुळेच शिवशक्ती महिला संघाने मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेचे प्रथमच विजेतेपद साकारले.
व्यावसायिक पुरुष गटात भारत पेट्रोलियमने बँक ऑफ इंडियाचा १७-१० असा पराभव करून अपेक्षित जेतेपदावर मोहोर उमटवली. सामन्याच्या पहिल्या सत्रात बँक ऑफ इंडियाने आशीष म्हात्रे, शैलेश सावंत आणि जितेश जोशी या भारत पेट्रोलियमच्या दिग्गज खेळाडूंना डोके वर काढण्याची संधीच दिली नव्हती. त्यामुळे बँक ऑफ इंडियाकडे ५-३ अशी आघाडी होती.
दुसऱ्या सत्रात भारत पेट्रोलियमच्या शैलेश सावंतने ३ गुणांची कमाई करीत सामन्याला कलाटणी दिली. मग सूरजित सिंगने चढाईत आणखी दोन गुण मिळवत प्रतिस्पर्धी संघावर लोण चढवला. त्यानंतर भारत पेट्रोलियमचीच मक्तेदारी सामन्यावर होती.
स्पध्रेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष मदन पाटील यांच्या हस्ते झाला.
महिला गट
मालिकावीर : गौरी वाडेकर (शिवशक्ती)
सर्वोत्तम चढाईपटू : स्नेहल साळुंखे (शिरोडकर)
सर्वोत्तम पकडपटू : स्वप्नाली साखळकर (छत्रपती शिवाजी)
पुरुष व्यावसायिक गट
मालिकावीर : सूरजित सिंग (भारत पेट्रोलियम)
सर्वोत्तम चढाईपटू : अनिल पाटील (महाराष्ट्र पोलीस)
सर्वोत्तम पकडपटू : सूरज बनसोडे (बँक ऑफ इंडिया)
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2013 रोजी प्रकाशित
शिवशक्तीची युक्ती श्रेष्ठ!
शिवशक्ती विरुद्ध डॉ. शिरोडकर हा सामना अपेक्षेप्रमाणेच सुवर्णा बारटक्के आणि स्नेहल साळुंखे यांच्या चढायांच्या जुगलबंदीने पहिल्या सत्रात रंगला, परंतु उत्तरार्धात दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेत गुण घेण्याचा प्रयत्न न केल्यामुळे हा सामना ६-६ असा बरोबरीत सुटला.

First published on: 10-04-2013 at 03:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trick of shivshakti is seperior