ट्रक शर्यतीमुळे आयुष्याला कलाटणी मिळालेल्या चालकांचे प्रतिपादन
ट्रक ड्रायव्हर म्हणजे नशा करणारे.. असं काम ज्याला समाजात काही महत्त्व नाही, सततचे टोमणे, हीन वागणूक, त्यामुळे अनेकदा मुलांनाही आपण ट्रक चालवत असल्याचे सांगायला लाज वाटायची. पण ‘टाटा’च्या ट्रक शर्यतीमुळे समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. समाजात आम्हालाही मान मिळू लागला, अशी प्रतिक्रिया टी-१ प्रायमा ट्रक शर्यतीत सहभागी झालेल्या चालकांनी दिली. चेन्नईच्या मद्रास मोटर्स रेसिंग ट्रॅकवर (एमएमआरटी) सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातून १९ मार्चला होणाऱ्या अंतिम शर्यतीसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
नोएडा येथील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर १९ मार्चला चौथी टी-१ प्रायमा ट्रक शर्यत पार पडणार आहे. चौथ्या हंगामात अधिकाधिक भारतीय ट्रकचालकांना सहभाग घेता यावा यासाठी टाटाने ‘चॅम्पियन्स क्लास’ या नव्या विभागाचा समावेश केला आहे. २०१४ साली या स्पध्रेला सुरुवात झाली, परंतु गेल्या हंगामात पहिल्यांदा भारतीय ट्रकचालकांना शर्यतीत सहभागी करून घेतले. त्यातील अव्वल १० शर्यतपटूंना ‘चॅम्पियन्स क्लास’मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. या माजी शर्यतपटूंना गेल्या सत्रातील अनुभवाबद्दल विचारले असता त्यांनी ही स्पर्धा आयुष्याला नवी दिशा देणारी असल्याचे सांगितले.
गतविजेता जगत सिंग म्हणाला की, ‘‘हरयाणाच्या लहानशा गावात मी वाढलो.. तिथे ट्रक चालवणे म्हणजे भिकेचे लक्षण मानले जायचे.. हा काही तरी वाईट काम करतोय, अशी संशयाची सुई सतत आमच्याकडे असायची.. मात्र गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकल्यानंतर सगळ्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.’’
अन् लग्नाच्या मागण्या येऊ लागल्या..
या शर्यतीचे व्हिडीओ यूटय़ूबवर २०१५ मध्ये पाहिले होते. तेव्हा भारतीय ट्रकचालकांचीही अशी शर्यत व्हावी असे मनात आलेले आणि २०१६ मध्ये हे स्वप्न सत्यात उतरले. ट्रकचालक म्हणून समाजात मान मिळत नव्हता आणि लग्नाला कुणी मुलगीही देत नव्हते. पण या शर्यतीत सहभागी झालेले पाहून आमच्याकडे पाहण्याची नजरही बदलली. लग्नाच्या मागण्याही येऊ लागल्या, असे गेल्या वर्षी उपविजेता ठरलेल्या हैदराबादच्या नागार्जुन ए. याने सांगितले.
ट्रकचालक असल्याचे मुलाला अभिमानाने सांगतो
खालच्या दर्जाचे लोक असे माझ्याकडे पाहिले जायचे. रोज टोमणे ऐकायला लागायचे. याचा परिणाम मुलाच्या भविष्यावर होऊ नये म्हणून गाव सोडले. पण मुलाला मी ट्रक चालवत असल्याचे कधी कळू दिले नाही. शाळेत मुलाची खिल्ली उडवली जाऊ नये म्हणून शिक्षकांपासूनही ही गोष्ट लपवली. पण या शर्यतीत सहभागी झाल्यानंतर माझे व्हिडीओ यूटय़ूबवर मुलाने पाहिले. त्या वेळी मला भीती वाटली, परंतु मी ट्रक रेसर असल्याचा त्याला फार आनंद झाला. त्याच्या शाळेतही माझी हीच ओळख बनली आहे. आता मुलाला ट्रकचालक असल्याचे अभिमानाने सांगतो, अशी प्रतिक्रिया मलकीत सिंगने दिली.
टी-१ प्रायमा ट्रक अजिंक्यपद शर्यत
- प्रो क्लास : १२ आंतरराष्ट्रीय शर्यतपटू
- सुपर क्लास : १० नवोदित भारतीय शर्यतपटू
- चॅम्पियन्स क्लास : गतवर्षीच्या शर्यतीतील दहा भारतीय शर्यतपटू