कोणत्याही मोठ्या स्पर्धेच्या अंतिम लढतीच्या टॉसवेळी रवी शास्त्री असणं स्वाभाविक मानलं जातं. आशिया चषकाच्या फायनलच्या टॉसवेळीही रवी शास्त्रीच होते. मात्र त्यांच्या बरोबरीने आणखी एक निवेदक पाहून जगभरातली चाहते चक्रावले. नेमकं काय झालं ते समजून घेऊया.
टॉसवेळी निवेदक, दोन संघांचे कर्णधार आणि मॅचरेफरी उपस्थित असतात. या सगळ्यांच्या बरोबरीने काहीवेळेस प्रायोजकांचा प्रतिनिधीही असतो. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एकच निवेदक टॉसची घोषणा करतो. टॉस कोणी जिंकला ते सांगतो. त्यानंतर दोन्ही कर्णधारांशी संवाद साधतो. रविवारीही असंच होणं अपेक्षित होतं. मात्र टॉसच्या वेळी रवी शास्त्री यांच्या बरोबरीने पाकिस्तानचे माजी गोलंदाज वकार युनिस उपस्थित होते. दोन निवेदक पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटलं.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा यांच्यासह मॅचरेफरी रिची रिचर्डसन उपस्थित होते. सूर्यकुमारने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर रवी शास्त्री यांनी सूर्यकुमारशी संवाद साधला. सूर्याचं बोलणं झाल्यावर वकार युनिस यांनी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा याच्याशी संवाद साधला. सूर्यकुमार आणि सलमान यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं नाही.
भारताच्या रवी शास्त्री यांनी सूर्यकुमारशी संवाद साधला तर पाकिस्तानच्या वकार युनिस यांनी सलमान अली अघाला बोलतं केलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टॉसवेळी तटस्थ निवेदक असावा अशी विनंती आशियाई क्रिकेट परिषदेकडे केली होती का यासंदर्भात चित्र स्पष्ट होऊ शकलं नाही.
प्राथमिक फेरीच्या लढतीत टॉसवेळी सूर्यकुमार यादवने सलमान अली अघाशी हस्तांदोलन करणं टाळलं होतं. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. यानंतर पाकिस्तानने मॅचरेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांची आयसीसीकडे तक्रार केली. पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी पाकिस्तानने केली. आयसीसीने ही विनंती फेटाळली. पाकिस्तानने उर्वरित सामन्यांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. बांगलादेशविरुद्धची लढत तासभर उशिराने सुरू झाली. पाकिस्तानने उर्वरित सामने खेळण्याचा निर्णय घेतला. सुपर फोरच्या लढतीतही भारताने हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघाने हस्तांदोलन न करण्याच्या मुद्यावरून नाराजी व्यक्त केली. दोन्ही देशांचे संबंध दुरावलेले असताना सामने झाले आहेत. त्यावेळी हस्तांदोलन केलं होतं असं सलमान म्हणाला.