दिल्लीला हरवून जयपूर अव्वल स्थानी ’ यू मुंबाची तेलुगूशी बरोबरी

दबंग दिल्लीचा इराणी संघनायक मेराज शेखने आपल्या लवचीकतेचा प्रत्यय घडवत हुकमी चढाया आणि पकडी केल्या. परंतु त्याची ही एकाकी झुंज अपयशी ठरली. जयपूर पिंक पँथर्सने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत दिल्लीला २४-२२ असे पराभूत केले आणि प्रो कबड्डी लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर मुसंडी मारली आहे. याचप्रमाणे यू मुंबाला तेलुगू टायटन्सने बरोबरीत रोखले.

वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पध्रेत जसवीरने आपल्या शैलीदार चढायांच्या बळावर प्रारंभीपासून वर्चस्व निर्माण केले. परंतु दिल्लीकडून मेराजचा प्रतिकार रोखणे जयपूरला अवघड जात होते. मध्यंतराला जयपूरने १४-११ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात मात्र कमालीची चुरस टिकून होती. मात्र जयपूरने शांत चित्ताने खेळ करीत सामना हातातून निसटू दिला नाही.

दुसऱ्या सामन्यात अनुप कुमारच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर यू मुंबाने मध्यंतराला १६-७ अशी आघाडी मिळवली. पहिल्या सत्रात सावधपणे खेळणाऱ्या राहुल चौधरीने दुसऱ्या सत्रात अप्रतिम खेळ केला. त्यामुळे २८व्या मिनिटाला तेलुगू टायटन्सने लोणची परतफेड केली आणि यू मुंबाला १७-१७ असे बरोबरीत गाठले. त्यानंतर हा सामना २५-२५ असा बरोबरीत सुटला.

आजचे सामने

  • जयपूर पिंक पँथर्स वि. पाटणा पायरेट्स
  • यू मुंबा वि. बंगाल वॉरियर्स
  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ व एचडी २, ३.