मँचेस्टर : क्लब फुटबॉलमध्ये सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स लीगच्या नव्या हंगामास आज, मंगळवारपासून सुरुवात होणार असून, पहिल्या दिवशी रेयाल माद्रिद, आर्सेनल, बोरुसिया डॉर्टमंड आणि युव्हेंटस असे तगडे संघ मैदानात उतरणार आहेत. गतविजेता पॅरिस सेंट-जर्मेन संघ आपल्या मोहिमेची सुरुवात बुधवारी करेल.यंदाच्या हंगामात इंग्लिश प्रीमियर लीगमधील सहा संघ सहभागी होणार आहेत. गतवर्षी या लीगचे स्वरूप बदलण्यात आले. पारंपरिक गट साखळी ऐवजी आता स्पर्धा लीगच्या स्वरुपात घेण्यात येणार आहे. यानुसार एका संघाला आठ वेगवेगळ्या संघांशी सामना करावा लागेल.

गेल्या पर्वात आर्सेनलला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली होती. या वेळी व्हिक्टर ग्योकेरेस, एबेरेची एझे, मार्टिन झुबिमेंडी आणि नोनी माडुएके यांच्या समावेशामुळे आर्सेनलला अॅथलेटिक बिल्बाबाओविरुद्ध सलामीची लढत खेळताना सरस कामगिरीची अपेक्षा आहे. तब्बल १५ वेळा युरोपीय विजेते ठरलेला रेयाल माद्रिद संघ कायमच धोकादायक राहिला आहे. किलियन एम्बापे, व्हिनिशियस यांसारख्या तारांकितांचा समावेश असलेला रेयाल माद्रिद संघ यंदा चॅम्पियन्स लीगची सुरुवात मार्सेविरुद्ध करेल.

युव्हेंटस आणि डॉर्टमंड हा आणखी एक सामना पहिल्या दिवशी होईल. या सामन्याकडे १९९७च्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती म्हणून बघितले जात आहे.