Vaibhav Suryavanshi inning in INDu19 vs ENGU19 Match: भारताच्या सिनियर संघाबरोबर भारताचा अंडर-१९ संघही इंग्लंड दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. अंडर-१९ संघाचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एक विस्फोटक खेळी करत चौकार-षटकारांची आतिषबाजी केली आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात वैभव सूर्यवंशीने वादळी फलंदाजी करत एक विक्रमही आपल्या नावे केला आहे.
भारत आणि इंग्लंडच्या अंडर-१९ संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात, वैभवने आपला वादळी फलंदाजी करण्याचा सिलसिला सुरूच ठेवला. वैभवने फक्त २० चेंडूत तुफानी अर्धशतक झळकावलं. पण अवघ्या काही धावांनी वैभवचं शतक हुकलं. वैभवने त्याच्या विस्फोटक खेळीत ९ षटकार लगावले आहेत.
युवा एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच २ जुलैला इंग्लंडमधील नॉर्थम्प्टन येथे खेळवला जात आहे. पावसामुळे हा सामना ४० षटकांचा करण्यात आला आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ४० षटकांत २६९ धावांचे लक्ष्य दिले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी भारतालाही जोरदार सुरूवात करावी लागणार होती. ही जबाबदारी वैभव सूर्यवंशीने घेत वादळी फटकेबाजी केली.
वैभवला पहिल्या दोन सामन्यांमध्ये अर्धशतकाच्या जवळ येऊन बाद झाल होता. पण या सामन्यात त्याने ही कसर भरून काढली. वैभव सूर्यवंशीने २० चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने अवघ्या सहाव्या षटकात पन्नास धावांचा टप्पा गाठला. यासह वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ वनडेमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. फक्त ऋषभ पंतने आजवर अंडर-१९ मध्ये १८ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक केलं आहे.
वैभव त्याच्या शतकाच्या अगदी जवळ होता पण त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. वैभवने यासह फक्त ३१ चेंडूत ९ षटकार आणि ६ चौकारांसह ८६ धावांची संस्मरणीय खेळी खेळली आणि फक्त १४ धावांनी त्याचं शतक हुकलं. पण त्याने संघाला चांगली सुरूवात करून देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.