Vaibhav Suryavanshi Batting In Under 19 NCA Camp: आयपीएल २०२५ स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. १३ वर्षीय वैभववर राजस्थान रॉयल्सने १.१० कोटींची बोली लावली. पहिल्याच हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. या हंगामात त्याने वेगवान शतक झळकावलं. आयपीएल स्पर्धेत राडा घातल्यानंतर आता त्याने इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे.
या महिन्याच्या शेवटी भारतीय १९ वर्षांखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी आणि ५ वनडे सामन्यांचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना २७ जूनला खेळला जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली आहे. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करताना दिसेल.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज एनसीएच्या अंडर १९ कॅम्पमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसून येत आहे. त्याची आक्रमक फलंदाजी पाहून इंग्लंडचे गोलंदाज नक्कीच घाबरले असतील. वैभवने आयपीएल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे.

त्यामुळे १९ वर्षांखालील गोलंदाजांचा सामना करणं त्याच्यासाठी मोठी गोष्ट नसेल. आयपीएल २०२५ स्पर्धेत तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसून आला. या संघाकडून खेळताना त्याने ७ सामन्यांमध्ये २०६.५५ च्या स्ट्राईक रेटने २५२ धावा चोपल्या. या हंगामात त्याने सर्वोत्तम स्ट्राईक रेटचा पुरस्कार आपल्या नावावर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल २०२५ स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करून त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर जयपूरच्या मैदानावर खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध केलेली खेळी ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी ठरली. अवघ्या ३५ चेंडूत त्याने आपलं शतक पूर्ण केलं. यासह या स्पर्धेच्या इतिहासात तो सर्वात वेगवान शतक झळकावणारा युवा फलंदाज ठरला.