आयपीएल २०२५ मध्ये आपल्या वादळी फटकेबाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची लक्षवेधक कामगिरी सुरूच आहे. वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपताना दिसत आहे. वैभवची आगामी अंडर-१९ संघात निवड करण्यात आली आहे, त्यामुळे त्याचा फॉर्म ही संघासाठी चांगली गोष्ट असेल. वैभवने इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी सराव सामन्यात वादळी खेळी केली आहे.

इंग्लंडला जाण्यापूर्वी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात वैभव सूर्यवंशीने दमदार फलंदाजी केली. हा सराव सामना एनसीएमध्ये खेळला गेला होता. आयपीएल २०२५ मध्ये २०६ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करणाऱ्या वैभवने एनसीए सराव सामन्यातही त्याच अंदाजात फलंदाजी केली.

भारताचा १९ वर्षांखालील संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये आयुष म्हात्रे संघाचा कर्णधार आहे. तर वैभव सूर्यवंशी आयुषसह सलामीला उतरणार आहे. इंग्लंडला जाण्यापूर्वी एनसीएमध्ये खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात १४ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीने धुमाकूळ घातला. वृत्तानुसार, त्याने २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना फक्त ९० चेंडूत १९० धावा केल्या.

वैभव सूर्यवंशी त्याच्या गगनचुंबी षटकारांसाठीही ओळखला जातो. त्याने या सराव सामन्यात षटकारांचा पाऊस पडल्याचा उल्लेखही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. त्याने किती षटकार मारले याबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही.

वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता. राजस्थान फ्रँचायझीने त्याला १.१० कोटी रुपयांना खरेदी केले. वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान संघासाठी त्याने वादळी फटकेबाजी केली आणि अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. त्याने लीगमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी फक्त ७ सामने खेळले. ज्यामध्ये त्याने २०६ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने २५० पेक्षा जास्त धावा केल्या.

आयपीएल पदार्पणाच्या हंगामातच त्याने एक धमाकेदार शतकही झळकावले. जे आयपीएलच्या इतिहासात भारतीय खेळाडूने केलेले सर्वात जलद शतक होते. वैभव सूर्यवंशीने ते शतक फक्त ३५ चेंडूत पूर्ण केले. यासह, तो ख्रिस गेलनंतर आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा फलंदाज बनला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एनसीएमध्ये या आधी झालेल्या सराव सामन्यातही त्याने अशीच वादळी खेळी केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा त्याने आपला शानदार फॉर्म दाखवून दिला. आयपीएल २०२५ नंतर, वैभव सूर्यवंशीसमोर आता इंग्लंडचे आव्हान आहे. तो भारतीय अंडर १९ संघासह पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यावर जात आहे. सराव सामन्यांमधील त्याची कामगिरी पाहता तो इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करेल.