हॉकी इंडिया लीग ही खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभवाबरोबरच वैयक्तिक आर्थिक फायदा देणारी स्पर्धा आहे. मुंबईचा हॉकीपटू युवराज वाल्मीकी याने या स्पर्धेद्वारे त्याला मिळणाऱ्या मानधनातून आपले घराचे स्वप्न साकार करण्याचे ठरविले आहे. युवराज याला दिल्ली व्हेवरायडर्सने १८ हजार डॉलर्सच्या मानधनावर खरेदी केले आहे. मरीन लाईन्स येथे एका छोटय़ाशा खोलीत तो आपल्या कुटुंबियांसह राहतो. हॉकी लीगमधील मानधनाचा उपयोग त्याने नवीन घर घेण्यासाठी करण्याचे ठरविले आहे. तो म्हणाला, ‘‘या मानधनामुळे माझ्या पालकांपुढील आर्थिक समस्या दूर होणार आहे. आमचे कुटुंब मोठे आहे. सर्वाना सामावून घेता येईल, अशी जागा मी घेणार आहे. जेव्हा मी हॉकीची कारकीर्द सुरू केली, त्या वेळी मला या खेळाद्वारे चांगला पैसा मिळेल, अशी मी अपेक्षाही केली नव्हती. हॉकी लीगमुळे भारतीय खेळाडूंचे राहणीमान वाढण्यास मदत होणार आहे. या स्पर्धेला असाच प्रतिसाद मिळत राहिला, तर दरवर्षी ही स्पर्धा आयोजित  केली जाईल व त्याचा फायदा भारतीय खेळाडूंना होईल.’’