आशिया चषकात ७ सप्टेंबरला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानसमोर विजयासाठी १२९ धावांचे आव्हान ठेवले होते. कमी धावसंख्येचे आव्हान असूनही अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक गडी राखून पराभव केला आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. मात्र, या सामन्यानंतर घडलेल्या घटनेमुळे या स्पर्धेला गालबोट लागले आहे.

आशिया चषक सामन्यातील गुरुवारचा दिवस अतिशय लाजिरवाणा होता. मैदानामध्ये सुरू झालेली ही लढत स्टेडियमच्या बाहेरपर्यंत पोहोचली. अफगाणिस्तानने हा सामना गमावल्यानंतर अफगाणिस्तानचे चाहते स्टेडियममध्येच पाकिस्तानी चाहत्यांवर तुटून पडले आणि त्यांना बेदम मारहाण केली. अफगाण चाहत्यांनी स्टेडियमचेही नुकसान केले. या सगळ्याचे कारण होते ते म्हणजे पाकिस्तानी खेळाडू आसिफ अलीचे लज्जास्पद कृत्य.

आसिफ फलंदाजी करत असताना तो अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद याच्या चेंडूवर आऊट झाला. यानंतर आसिफला इतका राग आला की तो मैदानावरच फरीदला मारायला गेला. त्याने फरीदला बॅटने मारण्याचा प्रयत्न केला.

रवींद्र जडेजाच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी; जाणून घ्या कधीपर्यंत होणार मैदानावर पुनरागमन

शारजाहमध्ये सुरू असलेला हा सामना पाकिस्तानने भलेही जिंकला असेल, पण आसिफच्या या लाजिरवाण्या कृत्यामुळे पाकिस्तानी संघाला मान खाली घालवी लागली आहे. आसिफच्या या कृत्यानंतर आयसीसी त्याच्यावर बंदीही घालू शकते. या घटनेनंतर अफगाणिस्तानचे चाहते भडकले आणि त्यांनी सामन्यानंतर स्टेडियममधील खुर्च्या पाकिस्तानी चाहत्यांवर फेकण्यास सुरुवात केली.

आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात बुधवारी अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सहा विकेट गमावून १२९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल शेवटच्या षटकात नसीम शाहने मारलेल्या सलग दोन षटकारांच्या जोरावर पाकिस्तानने अखेरच्या षटकात मोठ्या कष्टाने विजयाचे लक्ष्य गाठले. हा सामना पाकिस्तानने जिंकला असेल, पण आसिफच्या लाजिरवाण्या कृत्यामुळे त्यांची मान शरमेने झुकली आहे.