Tanzim Hasan Rohit Paudel Argument In Live Match : बांगलादेशने सोमवारी नेपाळवर २१ धावांनी मात करत सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. टी-२० विश्वचषक २०२४ च्या ग्रुप स्टेजमधील या सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कारण लाइव्ह मॅचमध्ये दोन खेळाडू एकमेकांशी भिडले. एवढेच नाही तर यादरम्यान या दोन खेळाडूंमध्ये बाचाबाचीही झाली. वास्तविक, हा वाद नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल आणि बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तांझिम हसन साकीब यांच्यात झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तांझिम हसन आणि रोहित पौडेलच्या वादाचा व्हिडीओ –

त्याचे झाले असे की नेपाळच्या डावाच्या तिसऱ्या षटकात तांझिम हसन शाकिबने दोन विकेट्स घेतल्या होत्या. नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलला तांझिम हसन शाकिबने तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला. तांझिम हसन साकिबच्या या चेंडूवर नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने पॉइंटच्या दिशेने बचावात्मक शॉट खेळला. यानंतर बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तांझिम हसन साकिब त्याला खुन्नस देऊ लागला. ज्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु झाला. या काळात तांझिम हसन साकिबने नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलला धक्काबुक्की केली. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पंचांना हस्तक्षेप करावा लागला. ज्यामुळे हा वाद संपुष्टात आला.

या सामन्यात वेगवान गोलंदाज तांझिम हसन साकिबने सात धावांत चार विकेट्स घेत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. ज्यामुळे बांगलादेश संघ खराब फलंदाजीनंतही नेपाळला २१ धावांनी पराभूत करण्यात यशस्वी ठरला. त्याचबरोबर सुपर ८ मध्ये धडक मारु शकला. गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला चकित करणाऱ्या नेपाळच्या गोलंदाजांनी पुन्हा दमदार कामगिरी केली. त्यांनी बांगलादेशचा डाव १९.३ षटकांत १०६ धावांत गुंडाळला होता. प्रत्युत्तरादाखल, नेपाळची धावसंख्या एके काळी ५ विकेट्सवर ७८ धावा होती, परंतु त्यांनी त्यांचे उर्वरित ५ विकेट्स सात धावांत गमावले आणि त्यांचा संपूर्ण संघ १९.२ षटकांत ८५ धावांवर बाद झाला.

हेही वाचा – Rishabh Pant : राहुल-गोयंकांचा वादावादीच्या व्हिडीओवर ऋषभ पंतचं भाष्य; म्हणाला, “मलाही अनेकदा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२२ जूनला भारताविरुद्ध सामना –

भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२४ चा सुपर ८ फेरीतील सामना २२ जून रोजी अँटिग्वा येथे होणार आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये सुपर-८ फेरीचे सामने १९ जूनपासून सुरू होणार आहेत. टॉप-८ संघ सुपर ८ फेरीच्या सामन्यांसाठी पात्र ठरले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांनी सुपर ८ फेरीतील लढतीसाठी गट १ मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) आणि वेस्ट इंडीज यांनी गट-२ मध्ये स्थान मिळवले आहे. गट-१ आणि गट-२ मधील प्रत्येकी अव्वल २ संघ टी-२० विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील.