इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर भारताने वर्चस्व गाजवलं. पहिल्या डावात भारताने ३२९ धावा केल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या १३४ धावांमध्ये आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेत पहिल्या डावाअखेर भारताला १९५ धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान भारतीय चाहत्यांना सुखाचे अनेक क्षण अनुभवता आले. पण त्याचसोबत मैदानावर एक मजेशीर गोष्टही पाहायला मिळाली.

इंग्लंडची फलंदाजी सुरू होती. त्यांच्या फलंदाजीदरम्यान पाणी पिण्याची विश्रांती (ड्रिंक्स ब्रेक) घेण्यात आली. या विश्रांतीच्या वेळी सर्व भारतीय फलंदाज पाणी पिण्यासाठी खेळपट्टीच्या जवळ एकत्र आले. काही भारतीय खेळाडूंमध्ये मजा मस्करी सुरू होती. त्याच दरम्यान रोहित शर्माने ऋषभ पंतच्या डोक्यावर हळूच एक टपली मारली. वरच्या दिशेने शूटिंग होत असलेल्या कॅमेरामध्ये ते दृश्य टिपलं गेलं. विरेंद्र सेहवागने हा व्हिडीओ पोस्ट केला.

पाहा व्हिडीओ-

Ind vs Eng Video: कमनशिबी पुजारा! ‘अशा’ विचित्र पद्धतीने झाला बाद

दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या खेळात ऋषभ पंतच्या नाबाद अर्धशतकामुळे भारताने ३२९ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांची मात्र दाणादाण उडाली. सलामीवीर बर्न्स (०), सिबली (१६), लॉरेन्स (९), कर्णधार रूट (६), मोईन अली(६), ओली स्टोन (१), जॅक लीच (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) सारे स्वस्तात माघारी परतले. बेन स्टोक्स (१८) आणि ओली पोप (२२) यांनी थोड्या धावा केल्या, तर नवोदित बेन फोक्सने नाबाद ४२ धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला १३४ धावांपर्यंत मजल मारता आली.