दिल्लीत प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. पर्यावरणवाद्यांनी दिलेल्या भारत-बांगलादेश सामना हलवण्याच्या हाकेकडे दुर्लक्ष करीत उभय संघ रविवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताची विविध खेळाडूंची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
या सामन्याआधी शिखर धवनने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिखर धवन हा रोहित शर्माची चिमुकली समायरा हिच्याशी खेळताना दिसत आहे. समायरासमोर तो वाकल्यावर ती त्याला फटका मारण्याचा प्रयत्न करते आणि फटका लागल्याचे दाखवत तो पडण्याची नक्कल करतो, अशी धमाल- मस्ती करतानाचा हा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओत गोंडस समायराने गुलाबी रंगाचा झकास ड्रेस घातला असून ती आपल्या बाबाच्या मांडीवर विसावली आहे.
दरम्यान, भारताच्या या सामन्यावर प्रदुषणाची टांगती तलवार आहे. पण असे असले तरीही सामना दिल्लीतच होणार असे स्पष्ट करण्यात आले आहे. अखेरच्या क्षणी सामना अन्यत्र हलवणे अशक्य असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले. बांगलादेश संघाने याबाबत कोणतीही तक्रार केलेली नसली तरी आरोग्याची चिंता अस्तित्वात आहेच. भारत दौऱ्यावर येण्याआधी अष्टपैलू शाकिब अल हसनवर घातलेल्या बंदीमुळे त्यांना धक्का बसला आहे.
