* १२ वेळा अमली पदार्थ घेतल्याचे उघडकीस
* अमली पदार्थाच्या व्यापाऱ्याशी अनेकदा संपर्कात
अमली पदार्थाच्या व्यापारात आपला कोणताही सहभाग नसल्याचा खुलासा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगने केला असला तरी त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल १२ वेळा हेरॉईन घेतल्याचा खुलासा रविवारी पंजाब पोलिसांनी करून खळबळ उडवून दिली. विजेंदरने अमली पदार्थाचा व्यापारी अनुप सिंह कहलान याच्याशी अनेक वेळा संपर्क साधला असल्याचे पोलिस चौकशीदरम्यान समजते. त्यामुळे विजेंदरचे पाय आणखी खोलात रुतत चालले आहेत.
पंजाब पोलिसांनी पत्रकात म्हटले आहे की, विजेंदरने बारा वेळा तर त्याचा सहकारी खेळाडू राम सिंगने पाच वेळा हेरॉईन घेतले असल्याचे सिद्ध झाले आहे. डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीत त्यांच्याकडून हे कृत्य झाले आहे. राम सिंगने अनुपकडून दोघांसाठी डिसेंबरमध्ये हेरॉईन मिळविले आणि दोघांनी त्याचे सेवन केले. पुन्हा त्याने जानेवारी व फेब्रुवारीत आणखी हेरॉईन मिळविले आणि दोघांनी ते सेवन केले.
पोलीस उपमहानिरीक्षक एम. एफ. फारुकी यांनी सांगितले, ‘‘आम्ही अनुपच्या मोबाईलवर आलेल्या फोनचा सविस्तर तपशील पाहिला असता विजेंदरने किमान ८० वेळा त्याला फोन केला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अमली पदार्थाच्या व्यवसायाशी त्याचा संबंध असल्याचे आम्हाला वाटत आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या रक्ताचे व केसांचे नमुने मागवणार आहोत, त्यासाठी आम्ही न्यायालयात त्यासंदर्भातचा अर्ज करणार आहोत. विजेंदरचा सहकारी खेळाडू राम सिंग याच्याकडे सखोल चौकशी केली असता विजेंदरच्या साथीत आपण गंमत म्हणून अमली पदार्थाचे सेवन केले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. तसेच त्याने विजेंदरच्या मोबाईलद्वारे कहलान याच्याशी अनेक वेळा बोलणे केले असल्याचेही राम सिंगने निवेदनात म्हटले आहे.
पंजाब पोलिसांनी विजेंदरची चौकशी केली असता, त्याने रक्त व केसांचे नमुने देण्यास नकार दिला होता. त्याने आपला या व्यवसायाशी कसलाही संबंध नसल्याचे ठामपणे सांगितले होते. मात्र त्याची चौकशी अद्याप पूर्ण झाली नाही. विजेंदर व कहलान हे ऑगस्टपासून एकमेकांशी सतत संपर्कात असल्याचे व त्यांनी एकमेकांना अनेक वेळा  एसएमएस पाठविल्याचे समोर आले आहे, असे फारुकी म्हणाले. त्याचबरोबर आपण अनेक वेळा राम सिंगशी बोललो असल्याचे कहलानने पंजाब पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले आहे.