भारताचा आघाडीचा थाळीफेकपटू विकास गौडा याने दोहा येथे सुरू असलेल्या आयएएएफ डायमंड लीग स्पर्धेत शनिवारी रौप्यपदकाची कमाई केली. विकास गौडाने ६३.२३ मीटर इतकी थाळीफेक करत ही किमया केली.
पोलंडच्या पीटर मलाचोवस्की याने ६६.७२ मीटर अशी कामगिरी नोंदवत सुवर्णपदकावर कब्जा केला. इस्टोनियाच्या गेर्ड कान्टरने ६२.९० मीटर थाळीफेक करत कांस्यपदक पटकावले. म्हैसूरच्या गौडाने यापूर्वी २०१० आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य तर २०१० दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.
धावपटू टिंटु लूका हिला महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिने २.००.५६ सेकंद अशी वेळ नोंदवली. केनियाच्या युनिस जेकपोएच हिने १.५९.३३ सेकंदासह सुवर्णपदक जिंकले. अमेरिकेच्या चॅनेल प्राइस हिने रौप्यपदकाची तर झेकोस्लोव्हाकियाच्या लेंका मॅसना हिने कांस्यपदकाची कमाई केली.