Vinesh Phogat Injury: भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या गुडघ्यावर गुरुवारी १७ ऑगस्ट रोजी मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिने २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले होते. भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंमध्ये विनेश फोगाटचाही समावेश होता. चीनमधील हँगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला थेट प्रवेश मिळाला होता. विनेश फोगाट १३ ऑगस्ट रोजी प्रशिक्षणादरम्यान जखमी झाली होती.

विनेश फोगाटने सोशल मीडियामध्ये ट्वीटरवर तिच्या शस्त्रक्रियेची माहिती दिली. त्यात डॉक्टरांसोबतचा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “ मी अजून पूर्णपणे फिट नसून त्यासाठी मला थोडा कालावधी हवा आहे. जेव्हाही मी पडले-अडखळले तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. जशी माझी देवावर श्रद्धा आहे, तशीच तुमचीही आहे. आज मी तुम्हाला फक्त डॉक्टरच नाही तर एक व्यक्ती म्हणून पाहते ज्यांच्याकडून मी जीवनाचा सल्ला घेत आहे. तुमच्याशी बोलल्याने मला आत्मविश्वास मिळाला, जगण्याची एक आशा आणि स्पष्टता मिळाली. धन्यवाद साहेब!”

हरियाणातील चरखी दादरी येथे जन्मलेली २५ वर्षीय विनेश फोगाट ही, कुस्तीपटू राजपाल फोगट यांची मुलगी आहे आणि विनेश गीता ही बबिता फोगाटची चुलत बहीण आहे. या फोगाट भगिनींनी देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. त्यांनी कॉमनवेल्थ गेम्स (२०१४ ग्लासगो, २०१८ गोल्ड कोस्ट आणि २०२२ बर्मिंगहॅम) मध्ये ३ सुवर्ण जिंकले आहेत. जकार्ता २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेशने ५० किलो गटात सुवर्णपदकही जिंकले. तसेच, २०२१ अल्माटी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. बबिता फोगाट ही भारतीय जनता पक्षाची खासदार आहे. विनेशने १३ डिसेंबर २०१८ रोजी कुस्तीपटू सोमवीर राठीसोबत लग्न केले. विनेश आणि सोमवीर २०११ पासून एकमेकांना ओळखत होते, दोघेही भारतीय रेल्वेत काम करत होते.

हेही वाचा: IPL2024: 3D प्लेअर वाद भारतीय क्रिकेटमध्ये आणणाऱ्या व्यक्तीला IPLमध्ये मिळाली महत्त्वाची जबाबदारी, LSG संघाची ठरवणार रणनीती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हे माझे स्वप्न होते, पण…’ – विनेश फोगाट

विनेश फोगाटने आधीच्या तिच्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, “१७ ऑगस्ट रोजी माझी मुंबईत शस्त्रक्रिया होईल, भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हे माझे स्वप्न होते, जे मी २०१८ मध्ये जकार्ता येथे जिंकले होते.” ती पुढे लिहिते की, “यावेळी दुखापतीमुळे माझ्या आशा-आकाशांना मोठा धक्का बसला आहे. राखीव खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवता यावे, यासाठी मी माझे म्हणणे संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे. माझ्या सर्व भारतीय खेळाडूंना पदक जिंकण्यासाठी मनापासून शुभेछा.”