विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा पहिला सामना रविवारी इक्वेडोर आणि यजमान कतारदरम्यान पार पडला. या सामन्यामध्ये इक्वेडोरने ऐतिहासिक कामगिरी करत विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यात यजमान संघाला पराभूत केलं. इक्वेडोरने सामना २-० च्या फरकाने जिंकला. विशेष म्हणजे सामन्याबरोबरच इक्वेडोर संघाच्या समर्थकांमुळेही हा सामना चर्चेत आहे. इक्वेडोरच्या समर्थकांनी सामना सुरु असतानाच मैदानामध्ये एकत्र घोषणाबाजी करत आम्हाला बिअर हवी आहे अशी मागणी केली. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये बिअर विक्रीस संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. स्पर्धा सुरू होण्यास ४८ तास बाकी असताना अचानक निर्णय बदलल्यामुळे हजारो मद्यप्रेमी प्रेक्षक नाराज झाले.

नक्की वाचा >> FIFA World Cup च्या पहिल्याच दिवशी अंबानींच्या Jio ला मागावी लागली माफी! चाहते म्हणाले, “तुमच्यापेक्षा ‘सोनी’ने…”; जाणून घ्या घडलं काय

इक्वेडोरचे चाहते सामना सुरु असताना ‘Queremos cerveza’ म्हणजेच ‘केरीमुस् तरवेसा’ अशा आरोळ्या देत होते. स्पॅनिश भाषेमध्ये या शब्दांचा अर्थ ‘आम्हाला बिअर हवी आहे’ असा होता. कतारने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेदरम्यान मैदानांमध्ये मद्य विक्री आणि मद्य सेवनावर बंदी घातली आहे. युरोपीयन देशांमधील विश्वचषक स्पर्धांमध्ये यापूर्वी अशी बंदी कधीही घालण्यात आली नव्हती. मात्र कतारमधील विश्वचषकामध्ये अशी बंदी घालण्यात आल्याचे बिअर शौकीन फुटबॉलपटू नाराज आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये इक्वेडोरचे चाहते मैदानात, “आम्हाला बिअर हवीय… आम्हाला बिअर हवीय…” असं ओरडत होते. . ६० हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या अल बायत स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यामध्ये चाहते बिअरवरील निर्बंध यजमान देशाने उठवावे अशी घोषणा करत असल्याचं दिसून आलं. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. पहिल्याच दिवशी अशी मागणी होत असल्याने हा विश्वचषक फारच रंजक होणार असल्याचं एकाने म्हटलं आहे.

‘विश्वचषक स्पर्धेच्या यजमान देशाचे प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) यांच्यात झालेल्या चर्चेनंतर स्टेडिअममध्ये बिअरची विक्री करण्यास संपूर्ण बंदी करण्यात आली आहे,’ असे फिफाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. स्टेडिअममधील महागडय़ा ‘लक्झरी’ भागामध्ये शँपेन, वाईन, व्हिस्कीसह अन्य अल्कोहोलयुक्त पेये दिली जाणार असली तरी सर्व आठ मैदानांवरील सर्वसामान्य तिकिटधारकांना केवळ अल्कोहोलविरहीत शीतपेयांवर समाधान मानावे लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपन्यांचं नुकसान
‘बडवायझर’ बिअर तयार करणारी कंपनी, ‘एबी इनबेव’ने १९८६ साली ‘फिफा’ सोबत करार केला आहे. त्यानुसार विश्वचषक स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये मद्यविक्रीचे अधिकृत हक्क कंपनीकडे आहेत. त्याच्या मोबदल्यात कंपनी ‘फिफा’ला अब्जावधी डॉलर देते. कतारने विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी जेव्हा आपली निविदा सादर केली तेव्हा आणि करार केला तेव्हाही ‘फिफा’चे सर्व व्यावसायिक करार स्वीकारले होते. त्यानंतर दिसणार नाही अशा ठिकाणी बडवायझरला स्टॉल लावण्याची परवानगीही देण्यात आली होती. त्यासाठी कंपनीने बडवायझरचा मोठा साठा लंडन येथून कतारमध्ये पाठवला आहे. मात्र, आता कतारने अचानक आपली भूमिका बदलल्यामुळे मद्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.