भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेत विराट कोहलीने अखेर आपलं खातं उघडलं. गेल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतली. सिडनीमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित-विराटची भागीदारी पाहायला मिळत आहे. पण विराटने एक धाव घेतल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
कोहलीने खातं उघडल्यानंतर त्याचं सेलिब्रेशनही केलं. विराटने पहिली धाव घेताच स्टेडियममध्ये चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आधीच गमावल्यानंतर, टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे.
२३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ चेंडूत ६९ धावांची भागीदारी केली. ११ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शुबमन गिल (२४) जोश हेझलवूडने झेलबाद केलं. यानंतर, जेव्हा विराट कोहली मैदानावर आला तेव्हा चाहत्यांनी उभं राहत त्याचं कौतुक केलं.
विराट कोहली स्ट्राईकवर होता आणि त्याने पहिलाच चेंडू टोलवला आणि एक धाव घेतली. संपूर्ण स्टेडियमने जणू काही त्याने शतक पूर्ण केल्याचा आनंद साजरा केला. विराट कोहलीनेही आनंद साजरा करण्यासाठी हाताची मूठ करत रोहितकडे पाहत येस्स असं करत पहिली धाव साजरी केली. मैदानावरील चाहत्यांचा जल्लोष पाहून विराटही हसतानाही दिसला. विराटच्या या प्रतिक्रियेचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
