भारताचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये दमदार खेळी साकारत शानदार शतक झळकावलं आहे. हे शतक ठोकत विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतलं हे ५० वं शतक झळकावलं आहे. या शतकानंतर सचिन तेंडुलकरने विराटचं कौतुक केलं आहे. एका भारतीय खेळाडूने माझा विक्रम मोडीत काढणं, यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया सचिनने दिली. यावेळी त्यांनी तरुण विराट कोहलीच्या ड्रेसिंग रूममधल्या पहिल्या दिवसाची आठवण सांगितली आहे.

‘एक्स’ खात्यावर लिहिलेल्या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकर विराटला उद्देशून म्हणाला, “जेव्हा मी तुला पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये भेटलो, तेव्हा आपल्या संघातील इतर खेळाडूंनी तुझी फिरकी घेतली आणि माझ्या पायाला स्पर्श करायला लावलं. त्या दिवशी मला हसू आवरता आलं नाही. पण लवकरच, तू तुझ्या क्रिकेटच्या अप्रतिम कौशल्याने माझ्या हृदयाला स्पर्श केलास. तो तरुण मुलगा आज ‘विराट’ खेळाडू झाला आहे. याचा मला खूप आनंद आहे.”

“एका भारतीय खेळाडूने माझा विक्रम मोडला, यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही. हे शतक विश्वकपसारख्या मोठ्या स्पर्धेत, उपांत्य फेरी सामन्यात आणि माझ्या घरच्या मैदानावर आलं आहे, त्यामुळे हे सोन्याहून पिवळं आहे,” अशी प्रतिक्रिया सचिनने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं ८० वं शतक आहे. कसोटी प्रकारात विराटच्या नावावर २९ तर ट्वेन्टी२० प्रकारात एका शतकाची नोंद आहे. २००९ मध्ये विराटने वनडे कारकीर्दीतील पहिल्यावहिलं शतक झळकावलं होतं. १४ वर्षानंतर विराटने वनडे शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटचं वनडेतलं न्यूझीलंडविरुद्धचं हे सहावं शतक आहे. मायदेशातलं कोहलीचं हे २२वं शतक आहे.