भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर पालकत्व रजा घेऊन विराट भारतात परतला. उर्वरित मालिकेत अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले तर एक सामना अनिर्णित राखला. आता इंग्लंड-भारत कसोटी मालिकेसाठी विराट भारताचा कर्णधार असणार आहे आणि अजिंक्य उपकर्णधार असणार आहे. या संदर्भात अजिंक्य रहाणे याला इंडियन एक्स्प्रेस.कॉमचे प्रतिनिधी संदीप द्विवेदी यांनी प्रश्न विचारला. त्यावर अजिंक्यने छान उत्तर दिलं.

IPL मध्ये ‘असा’ पराक्रम करणारा महेंद्रसिंग धोनी पहिलाच क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियातील अजिंक्यच्या यशानंतर त्याच्या आणि विराटच्या नेतृत्वशैलीची तुलना होण्यास सुरूवात झाली आहे. यावर मत काय असा प्रश्न अजिंक्यला विचारण्यात आला होता. त्यावर अजिंक्यने शांतपणे उत्तर दिलं. “विराट आणि मी दोघेही खूप चांगले मित्र आहोत. आम्हा दोघांनाही देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. आता इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत विराट कर्णधार आणि मी उपकर्णधार असणार आहे. आधी होतं तसंच आताही असेल. तो कर्णधार असताना मी माझ्या उपकर्णधार पदाच्या भूमिकेचा आनंद लुटत असतो. तसंच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराटच कप्तान असेल आणि मी बॅकसीटवर बसेन”, असं झकास उत्तर त्याने दिलं.

“विराट जेव्हा भारतात परतला आणि त्याच्या जागी मी जेव्हा कर्णधार म्हणून सूत्र हाती घेतली तेव्हा माझी विचारसरणी विराटसारखीच होती. मलादेखील माझ्या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची होती. माझ्या संघातील ११ खेळाडूंकडून १००टक्के खेळ खेळून घेणं आणि त्या सगळ्यांना योग्य वेळी खेळासाठी मैदानात गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी पाठवणं ही माझी भूमिका होती. आम्ही दोघंही खूप चांगले मित्र असल्याने आमची विचारसरणी खूपच मिळतीजुळती आहे. म्हणूनच तो कर्णधार असताना मी आरामात बॅक सीटवर असतो”, असं रहाणे म्हणाले.