Virat Kohli Records In Test Cricket: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासह त्याने १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. येत्या काही दिवसांत भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, बीसीसीआयने त्याला फेरविचार करण्याची विनंती केली होती. अखेर विराट आपल्या निर्णयावर अडून राहिला. त्याने आज पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली.

काही दिवसांपूर्वीच भारताचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. आता विराटची अचानक निवृत्ती म्हणजे भारतीय संघासाठी दुहेरी धक्का आहे. विराटने २०११ मध्ये वेस्टइंडिजविरूद्ध झालेल्या मालिकेतून आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरूवात केली होती. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ९२३० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३० शतकं आणि ३१ अर्धशतकं झळकावली आहेत.

विराट फलंदाज म्हणून उत्तम होताच, यासह कर्णधार म्हणूनही त्याने आपली छाप सोडली. भारतीय संघ परदेशात जाऊन मालिका जिंकण्यात संघर्ष करायच्या. पण, विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासारख्या संघांना घरात घुसून पराभूत केलं. यादरम्यान विराटने काही मोठे रेकॉर्ड्स देखील मोडून काढले.

विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड्स

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली १९ व्या स्थानी आहे. विराटने आपल्या कसोटी क्रिकेटमध्ये ९२३० धावा केल्या आहेत.

कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट कोहली सहाव्या स्थानी आहे. विराटला ६८ सामन्यांमध्ये भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही विराटचा दबदबा पाहायला मिळाला आहे. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत विराटने एकाच मालिकेत ६९२ धावा केल्या होत्या.

विराटने २०१८ मध्ये फलंदाजी करताना एकाच वर्षात १३२२ धावा चोपल्या होत्या. या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. मोहम्मद युसूफने २००६ मध्ये फलंदाजी करताना १३२२ धावा चोपल्या होत्या.

एकाच मालिकेत सर्वाधिक दुहेरी शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराटने २०१७-१८ मध्ये श्रीलंकेविरूद्ध झालेल्या मालिकेत २ दुहेरी शतकं झळकावली होती.

यासह एकाच मालिकेत सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही विराट दुसऱ्या स्थानी आहे. विराटने २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना एकाच मालिकेत ४ अर्धशतक झळकावले होते.

कर्णधार म्हणून कसा राहिलाय रेकॉर्ड?

कर्णधार म्हणूनही विराटने आपली छाप सोडली. एमएस धोनीने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीला ही जबाबदारी मिळाली होती. कर्णधार म्हणून विराटने ६८ सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं. यादरम्यान भारताने ४० सामने जिंकले, तर १ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यादरम्यान ११ सामने ड्रॉ झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचं नेतृत्व करत असताना विराटने फलंदाज म्हणूनही आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. विराटने ६८ सामन्यांमध्ये ६८ सामन्यांमध्ये ५८६४ धावा केल्या. यादरम्यान त्याने कर्णधार म्हणून २० शतकं झळकावली.