scorecardresearch

ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावत विराटने क्रमवारीत घेतली मोठी झेप, तब्बल ‘इतक्या’ स्थानांचा झाला फायदा

ICC Test Rankings: विराट कोहलीने कसोटी क्रमवारीत ८ स्थानांची मोठी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८६ धावांची इनिंग खेळल्यानंतर तो क्रमवारीत १३ व्या क्रमांकावर आला आहे.

ICC Test Rankings updates
विराट कोहली (फोटो-ट्विटर)

ICC Test Rankings Updates:अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीची शानदार खेळी पाहायला मिळाली. कोहलीने ३६४ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने १८६ धावांची खेळी केली. कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये प्रदीर्घ काळानंतर शतक झळकावले. या शतकासह त्याने कसोटी क्रमवारीत ८ स्थानांची मोठी झेप घेतली आहे. आता तो आयसीसी कसोटी क्रमवारीत ७०५ रेटिंगसह १३व्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या या खेळीतून त्याला ५४ रेटिंग मिळाले.

कोहलीशिवाय कर्णधार रोहित शर्मालाही कसोटी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. आता तो ७३९ रेटिंगसह १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, आर अश्विन गोलंदाजीत अव्वल स्थानावर आहे, त्याने जेम्स अँडरसनला ८६९ रेटिंगसह मागे टाकले आहे. रवींद्र जडेजा ४३१ रेटिंगसह अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल आहे.

कोहलीने २३ कसोटी सामन्यांनंतर शतक झळकावले –

२३ कसोटी आणि १२०५ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोहलीच्या बॅटमधून शतक पाहायला मिळाले. यापूर्वी कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कोहलीने कसोटी कारकिर्दीतील २८ वे शतक झळकावले.

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला –

अहमदाबाद कसोटीत शतक झळकावताच, विराट कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. सर्वात कमी डावात ७५ शतके झळकावणारा विराट जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने हा विक्रम ५२२ डावांमध्ये केला, तर सचिनने ७५ आंतरराष्ट्रीय शतके करण्यासाठी ५६६ डाव घेतले होते.

अक्षर पटेलनेही क्रमवारीत बाजी मारली –

अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलसाठी बॉर्डर-गावसकर करंडक खूपच चांगला होता. या मालिकेत त्याने एकूण २६४ धावा केल्या. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अक्षरने दोन स्थानांनी झेप घेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर त्याने फलंदाजीत ८ स्थानांची लांब उडी घेतली आणि तो ४४व्या क्रमांकावर आला.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून खेळवला जाणार –

विशेष म्हणजे भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. यावेळी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 15:43 IST