लंडन : भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीला गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडावे लागत असले, तरी त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केले. तसेच पुन्हा सूर गवसण्यासाठी कोहलीने स्वत:च मार्ग शोधणे गरजेचे असल्याचेही गांगुली म्हणाला.
‘‘कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडे फारच अप्रतिम आहेत. त्यामुळे त्याच्या क्षमतेवर आणि गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाहीत. गेला काही काळ त्याच्यासाठी अवघड ठरला आहे. त्याने अपेक्षित कामगिरी केलेली नसून त्यालाही याची जाण आहे. तो उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने त्याच्या कामगिरीने स्वत:साठी एक स्तर निश्चित केला आहे आणि गेल्या काही काळात तो स्तर गाठण्यात त्याला यश आलेले नाही. परंतु यातून बाहेर पडण्यासाठी, पुन्हा यशस्वी ठरण्यासाठी, धावा करण्यासाठी त्याने स्वत:च मार्ग शोधणे गरजेचे आहे. त्याला लवकरच सूर गवसेल याची मला खात्री आहे,’’ असे गांगुलीने नमूद केले. कोहलीची क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. मात्र, ३३ वर्षीय कोहलीला नोव्हेंबर २०१९पासून एकही शतक करता आलेले नाही. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतही तो अपयशी ठरला. त्यामुळे त्याला ट्वेन्टी-२० संघातून वगळण्याचा भारतीय संघाने विचार करावा, असे मत कपिल देव, विरेंद्र सेहवाग, मायकल वॉन यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने कोहलीची पाठराखण केली आहे. मात्र, दीपक हुडासारखे युवा फलंदाज प्रभावित करत असल्याने कोहलीवरील दडपण वाढले आहे.