Virat Kohli ODI Future: भारताचे दोन्ही दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पुन्हा क्रिकेट खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत हे दोन्ही खेळाडू पुनरागमन करणार आहेत. पण यादरम्यान आता विराट कोहलीबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत विराट खेळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही अखेरचे ९ मार्चला टीम इंडियाची जर्सी घालून मैदानावर उतरले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत जेतेपद पटकावलं होतं. यानंतर दोघेही आयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसले होते. त्यानंतर त्यांना खेळताना पाहण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. पण यादरम्यान अजित आगरकरांनी विराट कोहलीला फोन केला असता त्याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं रेव्हस्पोर्ट्जने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
विराट कोहलीच्या वनडे भविष्याबाबत प्रश्नचिन्ह
टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी दोघांनाही फोन करून ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारत अ संघाकडून खेळण्यास सांगितलं आहे. रोहित शर्माबरोबर याबाबत चांगली चर्चा झाली, तर विराट कोहलीने या विषयावर मौन बाळगलं आहे.
Revsportz च्या सूत्रांनुसार, मुख्य निवडकर्ता अजित अगारकर यांनी अलीकडेच अनुभवी फलंदाज विराट कोहलीशी वनडे क्रिकेटमधीव त्यांच्या भविष्यातील योजनांविषयी चर्चा करण्यासाठी संपर्क साधला. पण कोहलीच्या बाजूने अपेक्षित असा प्रतिसाद न मिळाल्याने काहीशी नकारात्मकता जाणवली. टीम मॅनेजमेंटनुसार रोहित शर्मा आणि कोहली दोघेही ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ वनडे मालिकेत सहभागी व्हावेत.
रेव्ह स्पोर्ट्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, विराट कोहली या प्रकरणावर मौन बाळगून आहे आणि ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या मालिकेत खेळण्यास तयार नाही. दुसरीकडे, रोहित शर्मा या मालिकेत खेळू शकतो. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धची एकदिवसीय मालिका ३० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना ३ आणि ५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. त्यानंतर, टीम इंडिया तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाईल.
विराट आणि रोहित बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर असल्याने त्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेपूर्वी अ संघांच्या सामन्यात सहभागी व्हावं, असं टीम मॅनेजमेंटचं म्हणणं आहे. दरम्यान विराट कोहली इंग्लंडमध्ये त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. विराट कोहलीचा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये तो अनुष्का शर्मा आणि अकायबरोबर लंडनमध्ये वेळ घालवत आहे. दरम्यान, रोहित शर्मा सध्या बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे, जिथे तो त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. रोहितच्या सरावाचे व्हीडिओदेखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे तो अ संघाविरूद्ध सामना खेळू शकतो, अशी चर्चा आहे.