दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सदस्य असणाऱ्या ए. बी. डिव्हिलियर्सने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केलीय. मागील तीन वर्षांपासून राष्ट्रीय संघामधून न खेळलेल्या डिव्हिलियर्सने यापुढे आपण इतर स्पर्धांमध्येही खेळणार नसल्याचं सांगत निवृत्ती जाहीर केलीय. ए. बी. डिव्हिलियर्सच्या या निवृत्तीच्या तडकाफडकी निर्णयामुळे आरसीबीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. मात्र त्याचबरोबर नुकताच कर्णधार पदावरुन पाय उतार झालेल्या विराटलाही या निर्णयामुळे दु:ख झालं आहे. विराट आणि डिव्हिलियर्सची जोडी ही आयपीएलमधील सर्वात चर्चेतील जोड्यांपैकी एक आहे. मात्र आता हे दोघे ड्रेसिंग रुम शेअर करणार नाहीत. डिव्हिलियर्सच्या निवृत्तीसंदर्भात ट्विटरवरुन विराटने भावनिक प्रतिक्रिया दिलीय.

नक्की वाचा >> निवृत्ती जाहीर करताना डिव्हिलियर्सने केला भारतीय चाहत्यांचा उल्लेख म्हणाला….

“आमच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूसाठी आणि मी आतापर्यंत भेटलेल्या सर्वात प्रेरणादायी व्यक्तीसाठी… तू जे काही (करियर) केलं आहेस त्याचा तुला फार अभिमान वाटला पाहिजे. भावा तू आरसीबीला जे काही दिलं आहे त्यासाठी तुला नक्कीच अभिमान वाटला पाहिजे. आपलं नातं हे खेळा पलिकडचं आहे आणि ते कायमच राहिलं,” असं कोहलीने म्हटलं आहे.

“याचा (या निर्णयाचा) माझ्या मनाला फार त्रास होतोय पण मला माहितीय तू तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी सर्वोत्तम निर्णय घेतला घेतलाय, जसा तू नेहमीच घेतोस. फार सारं प्रेम,” असं विराटने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलंय.

नक्की वाचा >> Sexting Scandal मुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये मोठा भूकंप; टीप पेनने सोडलं कर्णधार पद

विशेष म्हणजे डिव्हिलियर्सनेही यावर रिप्लाय करत, “माझ्याकडून पण तुला फार सारं प्रेम भावा,” असं म्हटलं आहे.

मागील तीन वर्षांपासून डिव्हिलियर्स त्याच्या राष्ट्रीय संघामधून खेळला नसला तरी तो आरसीबीसाठी खेळत होता. २०२१ च्या आयपीएलमध्ये तो आरसीबीसाठी १५ सामने खेळला. यामध्ये त्याने ३१.३० च्या सरासरीने ३१३ धावा केल्या. आता त्याने निवृत्तीची घोषणा केल्याने तो आयपीएलही खेळणार नाहीय. आयपीएलमध्ये त्याने एकूण ५ हजार १६२ धाव केल्या आहेत. तो आयपीएलच्या १८४ सामने खेळा असून त्याची सरासरी ३९.७० इतकी आहे. त्याचा स्ट्राइक रेट १५१.६८ इतका आहे. या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सर्व पर्वांचा विचार केल्यास सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल २० खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे.