Online Gaming Ban: केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५’ संसदेत मंजूर करून रिअल-मनी गेमिंगवर बंदी घातली. क्रिकेटच्या अर्थकारणाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आणि परिणामकारक अशी घटना ठरली. बीसीसीआयचा मुख्य प्रायोजकच ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील कंपनी होती. ज्यामुळे या कंपनीला आता प्रायोजकत्व सोडावे लागले आहे. या कंपन्यांनी क्रिकेटच्या अनेक लीगसाठी निधी पुरवला होता.
ड्रीम११ ने भारतीय राष्ट्रीय संघाच्या जर्सीवरील आपले नाव काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत ड्रीम११ आणि माय ११ सर्कल यासारख्या कंपन्यांनी क्रिकेटच्या अर्थव्यवस्थेत प्रमुख स्थान मिळवले होते. त्यांच्यावर अचानक बंदीची कुऱ्हाड कोसळल्यामुळे या अर्थव्यवस्थेत पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे. आयपीएलशी संबंधित काही करारही या कंपन्यांनी केले आहेत. तसेच क्रिकेटमधील काही मोठे खेळाडू या कंपन्यांचे चेहरे झाले होते.
खेळाडूंचे १५० ते २०० कोटी रुपयांचे नुकसान होणार
क्रिकबझच्या वृत्तानुसार, गेमिंगवरील बंदीच्या कायद्यानंतर या कंपन्या आता क्रिकेटपासून दूर परदेशात आपले बस्तान बसविण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपन्यांची जाहिरात करणाऱ्या भारतीय खेळाडूंना मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आयपीएल किंवा इतर क्रिकेट स्पर्धांदरम्यान क्रिकेटपटू फँटसी गेमिंगच्या जाहिराती करताना दिसत होते. या जाहिराती आता बंद होणार असल्यामुळे क्रिकेटपटूंना एकत्रितपणे १५०-२०० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते, असे सांगितले जाते.
कोण किती कमवतो?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ‘एमपीएल’च्या करारातून वर्षाला १०-१२ कोटींची कमाई करतो, असा अंदाज आहे. तर रोहित शर्मा आणि एमएस धोनी हे अनुक्रमे ड्रीम११ आणि विंझोमधून ६-७ कोटी रुपयांची कमाई करतात, असा अंदाज आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार हे काही कंपन्यांचे प्रमुख चेहरे असताना इतर खेळडूंनाही जाहिरातीसाठी घेतले गेलेले आहे. त्यांना वार्षिक १ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मिळत असल्याचे सांगितले जाते.

लहान स्पर्धा आणि जाहिरात बाजारालाही फटका
विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यामुळे क्रिकेटच्या लहान स्पर्धांना मोठा फटका बसणार आहे. अनेक क्रिकेट लीगना या कंपन्यांनी पाठिंबा दिला होता. युरोपियन क्रिकेट नेटवर्क लीग सारख्या स्पर्धांनी आपले काम या आठवड्यात थांबवले आहे. आयपीएलला माय११सर्कल कडून वार्षिक १२५ कोटींचा निधी मिळत होता, हे नुकसान भरून काढण्यासाठी आयपीएलला अधिक संघर्ष करावा लागणार नाही. मात्र छोट्या स्पर्धांना याचा मोठा भुर्दंड बसेल.
तसेच ऑनलाइन गेमिंग बंद झाल्यामुळे जाहिरात बाजारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, जाहिरात बाजारातील ऑनलाइन गेमिंगचा वाटा ७ ते ८ टक्क्यांच्या आसपास होता. रुपयांमध्ये सांगायचे झाल्यास ८००० ते १०,००० कोटींची उलाढाल फक्त ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातींमुळे होत होती.